आंब्याचे पीक नष्ट;वीटभट्ट्या कोसळल्या
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील अनेक भागात आज मंगळवारी (दि.11)वादळी वार्यासह गारांचा पाऊस कोसळला. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान पुन्हा एकदा झाले. मात्र अवकाळी पावसानंतरही तग धरुन राहिलेले झाडांवरील आंबे आजच्या वादळी वार्यासह झालेल्या गारपीटमुळे जमिनीवर कोसळले.दरम्यान, तालुक्यातील आंबा पीक घेणारे शेतकरी उध्वस्त झाले असून वीटभट्ट्या तर कोसळून गेल्या आहेत.
हवामान विभागाने गारपीटसह पाऊस होण्याचा इशारा दिला होता. कर्जत तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्य डोंगरालागत असलेल्या खांडस, नांदगाव,जामरुंग, पाथरज, मोग्रज, ओलमन, कशेळे आणि कळंब या भागाला वादळी वार्याच्या आगमनानंतर सुरु झालेल्या गारपीट आणि पावसाने अक्षरशः झोडपले. जवळपास दीड तास पावसाने धुमाकूळ घातला होता. कडधान्य पीक गेली काही दिवस शेतकरी काढत असून ते पीक आजच्या पावसाने भिजून गेले असून त्या कडधान्याला शेतातच मोड येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर येथील शेतकर्यांच्या फळबागांचे नुकसान झाले होते. मात्र आजच्या वादळी पावसाने त्या फळबागांचे उरले सुरले अस्तित्व देखील संपुष्टात आणले आहे.
कर्जत तालुक्यातील खांडस, नांदगाव, जामरुंग, मॉग्रेज, कशेळे, वारे या भागातील शेतकर्यांनी आंब्याच्या बागा निर्माण केल्या होत्या. त्यातून दरवर्षी चांगले उत्पादन शेतकरी घेतात. मात्र गारपीटमुळे आंबा पीक घेणारा शेतकरी उध्वस्त झाला असल्याची प्रतिक्रिया शेतकरी आणि खांडस गावाचे सरपंच मंगल ऐनकर यांनी व्यक्त केली आहे. मागील महिन्यात शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला किंवा पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचे कोणतेही अधिकारी पोहचले नाहीत, असेही त्यांनी सांगितले आहे. वीटभट्टी उत्पादन घेणार्या व्यवसायिकांचे गारपीटमुळे पुन्हा एकदा नुकसान झाले कर्जत तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी या वादळी वार्यासह गारा घेऊन आलेल्या पावसात उध्वस्त झाला आहे.