पुण्यात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस

। पुणे । प्रतिनिधी ।

राज्याच्या विविध भागात हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यात दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

पुणे शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास बाणेर, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, हडपसर आणि लोणी काळभोर परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. बाणेर भागात पावसाचा जोर अधिक असल्याने सखल भागात पाणी साचले होते. पिंपरी-चिंचवड शहरातही पावसाने अर्धा तास अक्षरशः झोडपून काढले. सकाळपासून सूर्य आणि ढगांचा लपंडाव सुरू होता, मात्र दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची आणि पादचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. हवामान खात्याने पुढील दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून, आजच्या पावसानंतर उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

विदर्भातील वाशिम जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः रिसोड तालुक्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. अवेळी आलेल्या या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. या पावसामुळे बीजवाई कांदा, आंबा आणि फळबागांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कापणीला आलेल्या पिकांना या पावसाचा मोठा फटका बसणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

Exit mobile version