विधवा महिलांसह तृतीयपंथीयांचा सत्कार
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरातील महिला ग्रुपच्यावतीने नुकताचा हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सवाष्ण सोहळ्यात विधवा महिलांसह तृतीयपंथीय यांना हळदीकुंकू आणि वाण देण्यात आले.
माथेरानमधील महिलांकडून एकत्रीतपणे सवाष्ण तीळगूळ सोहळ्याचे आयोजन केले जाते. वर्षा शिंदे व स्नेहल लोटणकर यांच्या माध्यमातून हा सवाष्ण हळदीकुंकू सण साजरा करण्यात आला. हा सण माथेरानमध्ये गेली 12 वर्ष सर्व जाती-धर्मातील विधवा स्त्रियांसाठी साजरा केला जात आहे. यावेळी या कार्यक्रमात विविध खेळ आणि लकी ड्रॉ याच्या माध्यमातून या स्त्रियांना आनंद देण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच, माथेरानमधील किन्नर समाज अस्मिता फांऊंडेशनच्या नीताजी केने यांच्या वाढदिवसानिमित्त सिमरन सिंह, आरती विश्वकर्मा, रज्जो केने यांनी माथेरान येथील विधवा महिलांना साड्यांचे वाटप केले. तृतीयपंथीय यांचा सुद्धा यावेळी आदरसत्कार करताना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी महिलांकरता विविध खेळांचे आयोजन केले होते. तसेच, लकी ड्रॉ मधून 5 विजेते काढण्यात आले. प्रत्येक विजेत्याला प्रेशर कुकर वाटप करण्यात आले असून या कार्यक्रमांमध्ये गौरी कवठाणकर यांनी आपल्या सुरेल आवाजात कार्यक्रमास येणाऱ्या महिलांचे मनोरंजन केले. यावेळी वर्षा शिंदे, स्नेहल लोटणकर, रेखा चौधरी, अर्चना बिरामणे, सोनम दाभेकर, प्राची कदम, वनिता दिघे, तन्वी दाभेकर, मनीषा शिंदे, गीता खाडे, रचना सावंत, हेमा सावंत, सुहासिनी दाभेकर, सुषमा जाधव, ज्योती सोनावणे, सातपुते, मंदा तुपे, विदुला खेडकर, कामिनी शिंदे, अर्चना कदम या महिला उपस्थित होत्या. तर, या कार्यक्रमाला वनिता दिघे, सुरेखा जाधव आणि ठक्कर यांनी सहकार्य दिले. या स्तुत्य कार्याचे समारंभाचे कार्यक्रमाचे समालोचन मंगेश मोरे यांनी केले. माथेरान पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सरिता मुसळे यांनी उपस्थिती लावून महिलांना महिलांचे अधिकार आणि पोलिसांचे कामे याबद्दल माहिती दिली.
