प्रेरणा महिला बचतगटाचा उपक्रम
। कुसुंबळे । वार्ताहर।
कातळपाडा येथे प्रेरणा स्वयं सहाय्यता महिला बचतगट यांनी मीना मनोज पाटील या विधवेच्या घरीच हळदीकुंकू समारंभ साजरा करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून या महिलांचे कोतुक होत आहे. एका ग्रामीण भागातील महिला जेव्हा एकत्र येतात आणि सौभाग्याचे लेणे समजला जाणारा हळदीकुंकू समारंभ एका विधवा महिलेच्या घरी साजरा करून तिचे औक्षण करून तिला वाण देतात आणि आपल्या आनंदाच्या क्षणांत तिलाही सोबत घेतात तेव्हा त्या महिला त्यातून समाजाला एक चांगला संदेश देतात त्याचे कोेतुक होणे गरजेचे आहे. असे मत यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्त्या जिविता पाटील यांनी व्यक्त केले.
सुरुवातीला प्रार्थना म्हटली गेली. त्यानंतर प्रत्येकीने स्वतःची ओळख सांगितली. त्यानंतर नाच, गाणी, भजनेही घेण्यात आले. यावेळी प्रेरणा स्वयं सहाय्यता महिला बचतगट अध्यक्ष नयना महेश पाटील, उपाध्यक्ष अल्पना नंदन पाटील, सचिव अस्मिता दिनम म्हात्रे, सदस्या अनुष्का म्हात्रे, सिद्धी वावेकर, हर्षदा पाटील, प्रणिता म्हात्रे, मिना पाटील, सीमा पाटील, रुपाली पाटील, मीनाक्षी जोशी तसेच दीपिका पाटील इ. महिलांनी उखाणे घेतले व हळदीकुंकू याविषयी आपले विचार व्यक्त केले तसेच एकमेकींचे ओक्षण करून वाण दिले. यावेळी या महिलांनी सामाजिक कार्यकर्त्या जिविता सूरज पाटील यांचा सन्मानपूर्वक शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व साडी, तसेच वाण देवून यथोचित सत्कार केला.