। मुरुड जंजिरा । प्रतिनिधी ।
जंजिरा किल्ला पाहण्यासाठी जलवाहतूक खोरा बंदरातून सुरु करण्यात आली. पर्यटकांना खोराबंदर जवळ असल्याने सर्वाधिक पर्यटक ह्या बंदरातून बोटीतून किल्ल्यात जातात. परंतु, पार्किंग विस्तारासाठी खोरा बंदरातील पार्किंग तीन वर्षे बंद आहे. त्यामुळे शेकडो गाड्या आजही रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे मागील तीन वर्षांत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मेरीटाईम बोर्डाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या हलगर्जीपणाचा फटका बसला असल्याचा बोलले जात आहे.
दरम्यान, मेरीटाईम बोर्डाने 2019 ला जेटी विस्ताराचे काम केले व एक कोटी खर्च करून 400 वाहने पार्किंग होतील, अशी भव्य पार्किंग बनवण्यात आली. आजही रोज पर्यटकांच्या 200 गाड्या बाहेर रस्त्यावर पार्किंग होतात. पार्किंग असूनही गाड्या बाहेर लागल्याने रोजचे चार हजार रुपयांचे नुकसान होत आहे. पार्किंग तीन वर्षे बंद असल्याने तीन वर्षांत मेरिटाईम बोर्डाचे 35 लाखांचे नुकसान झाले आहे, याला जबाबदार कोण? स्थानिक अधिकार्यांना विचारणा केली असता, ते म्हणतात तीन वर्षांत वरिष्ठ अधिकार्यांना 15 पत्रे पाठवली; परंतु कारवाई काहीही नाही. म्हणजे, टेंडर प्रोसेसेसाठी वरिष्ठ अधिकार्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याने दिसते.
राजपुरी जेटीवरील पार्किंगदेखील अनेक वर्षे पडून होते, नंतर टेंडर झाले. परंतु, काही अडचणींमुळे पार्किंग बंद करण्यात आले. पुन्हा आता मेरिटाइम बोर्डाने स्वतः कामगार ठेवून पार्किंग सुरु केले. आज राजपुरी येथील पार्किंगमधून रोज पाच हजार उत्पन्न सुरु झाले आहे. तसेच मुरुडलादेखील मेरिटाइम बोर्डाने स्वतः कामगार ठेवून पार्किंग सुरु करावे, अशी मागणी पर्यटक करीत आहेत.
खोरा बंदात मुख्य रस्त्यापासून जेटीपर्यंतचा रस्ता अनेक वर्षांनंतर सुरु झाला आहे. 350 मीटरचा हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा बनतोय. त्याची उंची 10 इंच असून, रुंदी कमी असल्याने उर्वरित रस्ता खाली राहणार आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होईल. संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
खोरा बंदराचा विकास जलद गतीने होणार आहे. पर्यटकांसाठी सोयीसुविधांचा विचार करूनच नियोजन करण्यात येणार आहे. पार्किंग लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वरिष्ठ अधिकार्यांकडून निर्णयाची अपेक्षा आहे. – समीर बारापात्रे, बंदर अधिकारी
पत्रकारांनी दिलेल्या माहितीची खात्री करून संबंधित केंद्रातील मंत्र्यांशी तातडीने चर्चा करून 15 दिवसांत हा प्रश्न निकाली लावू. खोरा पार्किंग सुरु करण्याबाबत तातडीने चर्चा करून प्रश्न सोडवू, याची खात्री देतो. – खा. सुनील तटकरे