| पनवेल | वार्ताहर |
भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाला विशेष महत्त्व असते. प्रत्येक सणाला वेगळे वैशिष्ट्य असून प्रत्येक घटकाला मानाचे स्थान आहे. मकर संक्रांतीचा सण नवीन जोडपे आनंदाने साजरा करते, यासोबतच लहानग्या बाळाचेदेखील बोरन्हाण केले जाते. यासाठी काळ्या रंगांची कपडे व हलव्याचे दागिने परिधान केले जातात. यासाठी ठाण्यातील बाजारांत नवनवीन डिझाईनचे आकर्षक हलव्याचे दागिने उपलब्ध आहेत. दागिन्यांसोबतच संक्रांतीला लागणाऱ्या सर्व वस्तूंनी बाजारपेठा बहरलेल्या आहेत.
खडीसाखर, लवंग, तीळ, वेलचीवर साखरेच्या पाकातून तयार होणारे हलव्याचे दागिने हे कौशल्याचे आणि चिकाटीचे काम आहे. नेहमी सोन्याच्या दागिन्यांच्या मोहात पडणाऱ्या महिलांना संक्रांतीसाठी मात्र हलव्याचेच दागिने लागतात. स्त्रियांसाठी बोरमाळ, ठुशी, तन्मणी, चिंचपेटी, मंगळसूत्र, बिंदली, बांगडी, शाही हार, राणी हार असे विविध दागिने बाजारात पाहायला मिळत आहेत; तर मुलांसाठी हार, घड्याळ, नारळ आणि लहान मुलांकरिता मुकुट, हार, बाजूबंद, हातातील गजरे अशा प्रकारचे दागिने उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे महिलांना घर सांभाळून नोकरीनिमित्त बाहेर पडावे लागते, त्यामुळे घरी दागिने बनवण्याऐवजी तयार दागिने खरेदी करण्यावर महिलांकडून जास्त भर दिला जात आहे.
सुट्टे हलव्याचे दागिने: शाही हार, राणी हार, चोकर (चिंचपेटी), मंगळसूत्र, नथ, बांगडी, बिंदली, मेखला, कानवेल या सर्व वस्तू 250 ते 500 पर्यंत उपलब्ध आहेत.
दागिन्यांच्या किमती रुपयांमध्ये: बाळकृष्ण सेट - 100, राधा सेट - 300, मिनी सेट - 300 ते 500, मोबाईल - 150, घड्याळ - 150, गुच्छ - 100, नारळ-100, नवऱ्या मुलाचा सेट - 600, नवरीचा सेट - 350 ते 2000, मेकला - 2000, मोठा सेट - 500, बारीक हलवा सेट - 800 ते 900, लक्ष्मी हार - 150.