माथेरानमधील हातरिक्षाचालक अजूनही उपेक्षितच

| माथेरान | वार्ताहर |

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये ई-रिक्षा येथील हातरिक्षा चालकांनाच चालविण्यासाठी द्याव्यात, असा कुठेही उल्लेख नसल्याने माथेरान मधील हातरिक्षा चालकांचा पुरता हिरमोड झाला असून, काही काळ अजून आपल्या छातीतील रक्त आटवून पुन्हा हातरिक्षा ओढाव्या लागणार आहेत, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याचिका दाखल करणाऱ्यांनी ई-रिक्षा या येथील स्थानिक भूमिपुत्र असलेल्या हातरिक्षा चालकांना चालविण्यासाठी द्याव्यात, अशी मागणी केली होती. पण, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये चालवण्याबाबत कोणताही उल्लेख नसल्याने ई-रिक्षा पुन्हा नगरपालिकेमार्फत ठेकेदाराकडून चालविल्या जातील का, अशी भीती स्थानिक हातरिक्षा चालकांमध्ये व्यक्त होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून ई-रिक्षा चालविण्यास हिरवा कंदील जरी दाखवला असला तरी त्या चालविण्यासाठी येथील हातरिक्षा चालक सक्षम आहेत, असे श्रमिक हातरिक्षा चालक मालक संघटनेकडून सांगण्यात आले. संघटनेकडून असे सांगण्यात आले की, हातरिक्षा चालकांनी ई-रिक्षा चालविण्याचे अधिकृत प्रशिक्षण घेतले आहे. असे असताना माथेरानबाहेरील ठेकेदारांच्या माध्यमातून हातरिक्षा चालविणे कितपत योग्य आहे. सनियंत्रण समितीने याकडे सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि ई-रिक्षा येथील श्रमिक आणि कष्टकरी हातरिक्षा चालकांना चालविण्यास द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.

आमच्या चार पिढ्यांनी हातरिक्षा चालवली, पण आमची आर्थिक उन्नती काही झाली नाही. याउलट, आमची शारीरिक आणि मानसिक स्थिती खालावत आहे. येथील रस्ता हा चढ-उताराचा आहे, त्यामुळे चढावावरून हातगाडी ओढताना रक्ताचं पाणी होतं. छाती फुटते की काय असं वाटतं. त्यामुळे या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्ती करण्यासाठी ई-रिक्षा आम्हा हातरिक्षा चालकांना द्याव्यात, अशी आमची सनियंत्रण समितीकडे मागणी आहे.

उमेश लोखंडे, हातरिक्षा चालक
Exit mobile version