| माथेरान | वार्ताहर |
सनियंत्रण समितीने श्रमिक हातरिक्षा संघटनेच्या उपोषणाची दखल घेत ई-रिक्षा संदर्भातील अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला असून त्याची एक प्रत माथेरान नगरपालिकेला सायंकाळी पाठविण्यात आली. उपोषण कर्त्यांना प्रतिज्ञा पत्राची प्रत प्राप्त होताच उपोषण स्थगित करण्यात आले. ई-रिक्षाचा अहवाल सनियंत्रण समितीने मा.सर्वोच्च न्यायालयात सादर करावा आणि माथेरान वासीयांची वरदान ठरलेली ई-रिक्षा सर्वांसाठी सुरळीत पुन्हा सुरू व्हावी ही मागणी घेऊन येथे माथेरान श्रमिक हातरिक्षा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य आपल्या कुटुंबासहित दि.19 श्रीराम चौकात आमरण उपोषणासाठी बसले होते. सकाळपासूनच येथे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तर, माथेरानमधील अनेक राजकीय पक्षांनी व संघटनांनी यावेळी त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. वेळोवेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून येथे उपोषणकर्त्यांची तपासणी देखील सुरू होती. उपोषण अधिक तीव्र होऊ नये याकरिता सनियंत्रण समितीने सायंकाळी उशिरापर्यंत ई-रिक्षाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला आणि सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्राची एक प्रत पालिका मुख्याधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांमार्फत उपोषणकर्त्यांना दिली. प्रत मिळाताच संघटनेचे सचिव सुनिल शिंदे यांनी येथे सर्वांसमोर वाचून दाखविल्यानंतर श्रमिक हातरिक्षा संघटनेने आपले उपोषण स्थगित केले.