पाच टक्के थकीत अनुदानाची मागणी
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीत दिव्यांगांना ग्रामपंचायतीच्या एकूण महसुलातील पाच टक्के निधी देण्यात आला नव्हता. त्यामुळे नेरळमधील दिव्यांगांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. आझाद समाज पक्ष आणि आधार अंध अपंग संस्था यांच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला. नेरळ ग्रामपंचायतीमध्ये 130 दिव्यांगांची नोंद आहे. ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या दीव्यांगांना ग्रामपंचायतीच्या एकूण महसूलापैकी पाच टक्के रक्कम दिव्यागनिधी म्हणून देण्यात येते. मात्र नेरळ ग्रामपंचायतीमध्ये नोंद असलेल्या 130 दिव्यागांना मागील तीन वर्षापासून त्यांचे हक्काचे अनुदान मिळाले नाही असा आधार अंध अपंग संघटनेचा दावा होता. त्यासाठी आधार संस्थेला नेरळमधील आझाद समाज पक्ष त्यांच्या हक्काचे अनुदान मिळण्यासाठी मदत करीत होते. हे अनुदान देण्यात यावे यासाठी नेरळमधील दिव्यांगांनी नेरळ ग्रामपंचायतकडे पाठपुरावा केला होता. तरी देखील पाच टक्के अनुदानाचे वितरण केले जात नव्हते. त्यासाठी आझाद समाज पक्षाने मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. तरीदेखील कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने नेरळ गावातील सर्व दिव्यांग रस्त्यावर उतरले.
नेरळ रेल्वे स्टेशन येथून निघालेला मोर्चा माथेरान रस्त्याने लोकमान्य टिळक चौकातून नेरळ ग्रामपंचायतीवर पोहचला. मोर्चामध्ये चालता येत नसलेल्या दिव्यांगांनी ट्राय सायकल वर बसून मोर्चात सहभाग नोंदवला. सरपंच उषा पारधी यांच्या कार्यालयात मोर्चेकऱ्यांच्या वतीने आझाद समाज पक्षाचे ॲड. सुमित साबळे, सिद्धार्थ सदावर्ते,आधार अपंग संघटनेचे अरुण जोशी, रवींद्र वझरकर, सुनील राजे, इब्राहिम शेख, किशोर कर्वे, विकास कुलकर्णी यांनी चर्चा केली. यावेळी ग्रामपंचायती मध्ये नोंद असलेल्या 130 दिव्यांग यांना 15 डिसेंबरच्या आत थकीत अनुदानापैकी 6000 चे अनुदान दिले जाईल तसेच उर्वरित अनुदान मार्च 2024 पूर्वी वितरित करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
करात सुट
अंध अपंग या दिव्यांग व्यक्ती यांना त्यांच्या घरपट्टी, पाणी पट्टी या कारमध्ये 50टक्के सवलत असल्याची माहिती मोर्चेकरी यांना ग्रामपंचायती कडून देण्यात आली.