आवक वाढूनही दर दोनशे ते पाचशे रुपये प्रति डझन
। नवी मुंबई । वार्ताहर ।
अवकाळी पावसामुळे हापूस आंबा झाडावरून काढून बाजारात पाठविण्याचे प्रमाण मागील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ बाजारात दररोज सत्तर हजारांपेक्षा जास्त हापूस आंबा विक्रीसाठी येत आहे. आवक वाढूनही हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. आकारानुसार हापूस आंबा कमीत कमी दोनशे ते पाचशे रुपये प्रति डझनने विकला जात आहे. तर एक आबा 15 ते 16 रुपये प्रति नग विकला जात आहे. बाजारात ज्या प्रमाणात आवक सुरू आहे, त्यावरून हापूसचा हंगामही या महिन्यात संपणार असल्याचे दिसून येत आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात अलीकडे अधूनमधून अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे यंदा बागायतदारांनी झटपट हापूस आंबा उतरवून मुंबई, पुण्याच्या बाजारात पाठविला आहे. कोकण तसेच राज्यातील इतर भागांतून सध्या दिवसाला सत्तर हजारांपेक्षा जास्त हापूस आंब्याच्या पेट्या (एक पेटी चार ते पाच डझनाची) बाजारात विक्रीसाठी येत आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आवक वाढल्याने भाव कमी होतील अशी अपेक्षा होती पण आजही मध्यम आकाराचा हापूस आंबा दोनशे ते पाचशे रुपये प्रति डझन विकला जात आहे. त्यामुळे एक आंब्याचा दर 15 ते 20 रुपये असल्याने कोकणचा हा राजा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसून येत आहे.
कोकणातील काही बागायतदारांनी हा आंबा थेट पणन करून खुल्या बाजारात विकलेला आहे. तुलनेने मोठ्या आकाराचा हा हापूस कमी दरात मिळत आहे. कोकणातील हापूस आंब्याबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील हापूस आंब्याच्या पेटया बाजारात येऊ लागल्या असून ही आवक दहा हजारांच्या घरात आहे. त्यामुळे घाऊक बाजारात हापूस आंब्याच्या पेट्या ठेवण्यास जागा नाही, असे चित्र आहे.
वाहतूक खर्च वाढल्याने दर अधिक
हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात मोठ्या आकाराच्या फळाचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे काही फळे आतून खराबही निघत आहेत. अवकाळी पावसाच्या भीतीने हापूस आंबा बाजारात पाठविण्याची अहमिका वाढली आहे. मात्र वाहतूक खर्च वाढल्याने हापूस आंब्याचे दर चढे असल्याचे समजते.