हापूस आंब्यावर ‘थ्रीप्स’चं संकट

। रत्नागिरी। प्रतिनिधी ।

जिल्ह्याचे प्रमुख पीक हापूस आंब्याला ‘थ्रीप्स’चा विळखा पडला असून मोहोर करपत चालला आहे. यावर्षीचा आंबा हंगामच बागायतदारांच्या हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील आंब्याला जगभरात मागणी आहे. देवगड, वेंगुर्ले, मालवण या तालुक्यांसह जिल्ह्याच्या बहुतांशी भागात आंबा लागवड असून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. देवगड हापूसला देशाच्या विविध बाजारपेठांसह जगभरात मागणी असते; परंतु, यावर्षी आंबा थ्रीप्समुळे धोक्यात आला आहे.

जानेवारीतील चांगल्या थंडीमुळे आंब्याला प्रचंड मोहोर आला. या कालावधीत वातावरणातील बदल आणि इतर काही गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणात थ्रीप्सचा प्रादुर्भाव देखील वाढू लागला. आतापर्यत कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात थ्रीप्सचा प्रादुर्भाव झालेला नव्हता. थ्रीप्समुळे हजारो हेक्टर बागांमधील आंब्याचा मोहोर बागायतदारांच्या नजरेसमोर करपू लागला आहे. फळे डागाळली जात आहेत. एक-एक फळावर दोनशे-दोनशे थ्रीप्स घोंघावत आहेत. बागेतून किंवा देवगड तालुक्यातील काही रस्त्यावरून चालताना देखील थ्रीप्सच्या झुंडी दिसून येत आहेत.


कधी नव्हे इतका थ्रीप्सचा प्रादुर्भाव आंबा बागांवर दिसत आहे. थ्रीप्स हवेत तरंगताना दिसत असून त्यावरून त्याच्या प्रमाणाची तीव्रता जाणवते. कोणत्याच किटकनाशकांना थ्रीप्स जुमानत नाही, ही वस्तुस्थिती आहे. थ्रीप्समुळे देवगड तालुक्यातील बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे.

बाळा मुळम, आंबा बागायतदार


कमाल आणि किमान तपमानातील फरक, ठराविक किटकनाशकांची सतत फवारणी यांसह विविध कारणांमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात आंब्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकर्‍यांनी विद्यापीठाने शिफारस केलेल्या किटकनाशकांची तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी.

डॉ. विजय दामोदर, फळसंशोधन उपक्रेंद, रामेश्‍वर देवगड
Exit mobile version