। पनवेल । प्रतिनिधी ।
शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ करून क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी विवाहितेने तिचा पती, सासू-सासरे आणि पतीची मैत्रीण यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 41 वर्षीय पीडित महिला तळोजा येथे राहत असून, त्यांना दोन मुले आहेत. 2009 साली उत्तर प्रदेश येथे त्यांचे लग्न झाले. त्यानंतर ‘माहेरहून काही हुंडा आणला नाही’, असे बोलून ‘तुझ्या आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये, अन्यथा तुमचा घटस्फोट करेन’, अशी धमकी सासरच्या मंडळींनी दिली. तर पीडितेने माहेरून काही आणले नाही म्हणून सासू-सासरे तिला शिवीगाळ आणि मारहाण करून छळ करू लागले. तसेच तिच्या पतीची मैत्रीण त्याला भडकवून पीडितेला मारहाण करायला लावायची. अखेर या जाचाला कंटाळून विवाहितेने याप्रकरणी तळोजा पोलिसांत तक्रार दिली आहे.







