हार्दिक पंड्या वर्ल्डकप मध्ये गोलंदाजी करेल : रोहित शर्मा

। दुबई । वृत्तसंस्था ।
आयपीएल तसेच इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यातही हार्दिक पंड्याने गोलंदाजी केली नाही. त्यामुळे पंड्याचा भारतीय संघातील नेमका ङ्गरोलफ काय, याविषयी चर्चा होणारच; मात्र रोहित शर्माने यावर भाष्य करीत सध्या तरी चर्चेला विराम दिला आहे. तो म्हणाला, टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आपल्या अभियानाला सुरुवात करेल, त्या वेळी पंड्या गोलंदाजी करेल अशी अपेक्षा आहे.
भारतीय संघ सध्या सहाव्या गोलंदाजाच्या शोधात आहे. त्यामुळे अंतिम 11 खेळाडूंचे समीकरण बसवताना पंड्याच्या गोलंदाजीविषयी विचार करणे भारतीय संघ व्यवस्थापनाला आवश्यक झाले आहे. त्याबाबत रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात नाणेफेकीनंतर भाष्य केले. या सराव सामन्यात रोहितकडे नेतृत्व देण्यात आले आहे. तो म्हणाला, हार्दिक लय मिळवत आहे; मात्र त्याने अद्याप गोलंदाजी केलेली नाही; मात्र मुख्य स्पर्धेला सुरुवात होताच तो गोलंदाजीसाठी सज्ज होईल. भारताची सलामी लढत येत्या रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होत आहे. आमच्या मुख्य गोलंदाजांमध्ये क्षमता आहे; मात्र सहाव्या गोलंदाजाचा पर्याय आवश्यक आहे, असे रोहितने स्पष्ट केले. संघ निवड करताना पंड्याची तंदुरुस्ती चिंतेचा विषय होता. कारण त्याने संपूर्ण आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नव्हती. त्याच वेळी संघाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी पंड्याची गोलंदाजी महत्त्वाची आहे, असे मत संघ व्यवस्थापनाचे आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या वक्तव्याला महत्त्व आहे. आम्हाला सहाव्या गोलंदाजाचा पर्याय उपलब्ध होईल, त्याचप्रमाणे फलंदाजीत काही पर्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे, असे सांगून रोहित म्हणाला, हे सर्व पर्याय आम्ही दुसर्‍या सराव सामन्यात तपासून पाहणार आहोत. पहिल्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला होता.

Exit mobile version