हरिहरेश्‍वर हिट अँड रन प्रकरण; तीन आरोपींना अटक

। श्रीवर्धन । संतोष चौकर ।

श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्‍वर या पर्यटनस्थळी ममता होम स्टेचे मालक अभी धामणस्कर व त्या ठिकाणी आलेले पर्यटक यांच्यामध्ये रूमच्या भाड्यावरून वाद झाला होता. यामध्ये अभी धामणस्कर यांची बहीण ज्योती धामणस्कर यांचा मृत्यू झाला होता. सर्व आरोपीं विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी ग्रामस्थांनी पकडून दिलेला एक आरोपी व श्रीवर्धन बस स्थानक परिसरात गाडीमधील दोन आरोपी सकाळी आढळून आले. या तिघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर उर्वरित आरोपी पुणे येथे फरार झाले होते. परंतु श्रीवर्धन पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले असता ते पुणे येथून फरार झाल्याने पोलिसांना सापडू शकले नव्हते. सदरचे आरोपी काही दिवस पुणे जिल्ह्यातील दौंड येथे गेल्याची बातमी मिळाली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी देखील शोध घेतला. परंतु आरोपी तेथून देखील पसार झाले होते.

त्यानंतर आरोपी इंदापूर व अकोला येथे गेल्याची बातमी पोलीस पथकाला मिळाली होती. त्याप्रमाणे पोलीस पथकाने इंदापूर व अकोला येथे जाऊन देखील शोध घेतला होता. परंतु आरोपी सापडून आले नव्हते. मात्र त्यानंतर आरोपी हे आपल्या घरी आल्याची खबर पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी सदर आरोपींना त्यांच्या घरून ताब्यात घेतले आहे. यामध्ये आकाश राजू उपरवट, वय 26 राहणार, कासरवाडी ता. हवेली जि. पुणे, सचिन सुभाष जमादार, वय 27 वर्षे, रा. कासारवाडी, हवेली, जिल्हा पुणे, आलीम मेहबूब नागोर, वय 22 वर्षे रा. कासारवाडी, हवेली, पुणे यांना राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेऊन श्रीवर्धन या ठिकाणी आणले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतरे, श्रीवर्धनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती. सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली असून तीन आरोपींचा शोध घेऊन श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. एस. लकडे, पोलीस उपनिरीक्षक एस.टी. लहाने, पोलीस शिपाई सोनवणे, पोलीस शिपाई निकाळजे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे.

Exit mobile version