। श्रीवर्धन । वार्ताहर ।
पर्यटन व्यवसायीकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असा दिवाळी हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच हरिहरेश्वर येथे शनिवारी मध्यरात्री पुणे येथील अकरा मद्यधुंद पर्यटकांनी लॉज मालकाशी केलेली खोली भाड्यावरून वादावादी व वादावादीचे रुपांतर लॉज मालकाच्या बहिणीच्या अंगावर गाडी नेत जीवे मारल्याची घटना. या धक्कादायक घटनेनंतर श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यवसायीकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हरिहरेश्वर येथील ममता होम स्टे चे मालक अभिजित धामणस्कर यांनी मद्यधुंद पर्यटकांना कमी भाड्यात खोली देण्यास नकार दिला. त्यानंतर धामणस्कर यांना झालेली मारहाण व स्थानिक येताच पळून जाणार्या पर्यटकांपैकी एका पर्यटकास स्थानिकांनी पकडून ठेवल्याने आपल्या साथीदाराला सोडवण्यासाठी परत होम स्टे येथे आलेले दहा मद्यधुंद तरूण.साथीदाराला स्थानिक सोडत नाहीत याचा राग मनात ठेऊन धामणस्कर यांच्या बहिणीच्या अंगावर गाडी नेत चिरडून जीवे मारल्याच्या घटनेमुळे श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यवसायीकांना आता आपण असुरक्षित झालोत, अशी भीती निर्माण झाली आहे.
या घटनेनंतर येथील पर्यटन व्यवसायीकांनी आपल्याला ही अनेकदा पर्यटकांकडून मनस्ताप होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. बहुतेक वेळा टोळक्याने आलेले तरुण रिसॉर्ट, होम स्टे व्यवस्थापनाशी अरेरावीची भाषा वापरतात. श्रीवर्धन तालुक्यात पर्यटनासाठी येणारे काही उत्साही पर्यटक आपल्या वाहनांच्या काचांना भारत सरकार, महाराष्ट्र शासन तसेच पोलीस नावाचे फलक व पुढील काचे जवळ पोलीस टोपी ठेवतात. यावेळेस आपण अधिकारी आहोत, अशी बतावणी करतात किंवा आमचे नातलग मोठ्या हुद्द्यावर कामाला आहेत, असे सांगत पर्यटन व्यवसायीकांशी दादागिरी करतात.अशा वेळी तुमची तक्रार वरपर्यंत करून तुमचा व्यवसायाचा परवाना रद्द करु अशी धमकी ही देण्यात येते. दरम्यान, पोलीसांनी सदरच्या वाहनांची चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे.