। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुका तसेच नवी मुंबई, ठाणे आणि रायगड पंचक्रोशीमध्ये लौकिक प्राप्त केलेला अखंड हरिनाम सप्ताह यावर्षीही अत्यंत उत्साहात सुरू होत आहे. श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ, अजिवली, पनवेल परिसरातर्फे आयोजित हा सप्ताहाची गुरुवार दि.18 डिसेंबर रोजी सकाळी काकड आरतीने प्रारंभ होणार असून गुरुवार दि.25 डिसेंबर रोजी सांगता होणार आहे.
2011 साली स्थापन झालेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळाचे हे 15 वे वर्ष आहे. या पंधरा वर्षांत मंडळाने हरिनामाचा जागर घरोघरी पोहोचविण्याचा सातत्यपूर्ण व प्रशंसनीय उपक्रम राबविला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सप्ताह पंचक्रोशीतील भक्तजनांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे भव्यतेने पार पडणार आहे. हा सप्ताह रोज सकाळी काकड आरतीने (सकाळी 4 ते 5 वा.) सुरू होईल. त्यानंतर हरिपाठ सकाळी 8 ते 11 वा. ज्ञानेश्वरी पारायण, तर रात्री 9 ते 11 वा. हरिकीर्तन असे नियोजन आहे. याव्यतिरिक्त दुपारी दु. 4 ते 5 वा. नामवंत प्रवचनकारांचे प्रवचन आणि रात्री विविध कीर्तनकारांचे हरिकीर्तन होणार आहे. या आठ दिवसांत हरिनामाच्या अखंड गजरात संपूर्ण परिसर भक्तिरंगात न्हाऊन निघणार आहे.







