। चिरनेर । प्रतिनिधी ।
बेलपाडा येथील श्रीकृष्ण वारकरी हरिपाठ मंडळाच्या वतीने तुकाराम गणा घरत यांच्या निवासस्थानी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी तुकोबाराय गाथा पारायणाचे वाचन होणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी (दि.5) अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला. हा अखंड हरिनाम सप्ताह शुक्रवार दि. 12 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यंदाचे हे 36 वे वर्ष म्हणजे त्रीतपपुर्ती सोहळा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. अखंड सप्ताहामध्ये काकड आरती, गाथा पारायण, संगीत भजन, हरिपाठ अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात खास महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामांकित कीर्तनकारांची किर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा समाजात असलेले ताणतणाव, साक्षरता, निसर्गप्रेम, समता आणि बंधुत्व, तसेच स्त्रीभ्रूणहत्या अशा महत्त्वाच्या विषयावरती विशेष मार्गदर्शन आणि प्रबोधन होणार असल्याची माहिती हभप गजानन ठाकूर महाराज व भजनी बुवा अशोक कान्हा म्हात्रे यांनी दिली.







