हरीश्री केमिकल्समध्ये वायूगळती

। खेड। प्रतिनिधी ।
येथील लोटे एमआयडीसीमधील हरीश्री केमिकल्स कं. लिमिटेड कंपनीच्या वायुगळतीमुळे बाजूला असलेल्या कृष्णा केमिकल्स कंपनीच्या सात कामगारांना त्रास निर्माण होऊन बेशुद्ध अवस्थेत पडले असून, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे हरीश्री केमिकल्स कं. लिमिटेड कंपनी केमिकल्सचे सांडपाणी कोतवाली, असगणी, घाणेखुंटच्या नदीत सोडले जाते. हरिश्री केमिकल्स कंपनीची इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. कंपनीमधील कामगारांच्या जीवाला धोका आहे. या कंपनीच्या तीन युनिटमधील कामगारांचा पगारीमधील पी.एफ. कापला जात नाही. या परिस्थितीची पी.एफ. अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्हा कामगार सरचिटणीस संदीप फडकले यांनी दिली आहे. या परिस्थितीची प्रशासनाने दखल घेऊन कंपनीवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी मनसे रत्नागिरी जिल्हा कामगार सरचिटणीस संदीप फडकले यांनी केली आहे.

Exit mobile version