2 हजार मतांनी हर्षदा मयेकर यांचा विजय; कार्यकर्त्यांचा जल्लोष
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ग्रामपंचायत निवडणूक जाहिर होताच नागांव ग्रामपंचायतीची निवडणूक चर्चेचा विषय होती. अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा सोमवारी (दि.6) निकाल लागला. नागांवमध्ये हर्षदा मयेकर यांनी केलेले काम आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पुन्हा एका मतदारांनी शेकापलाच पसंती दिली. तब्बल 2 हजार मतांच्या फरकाने हर्षदा मयेकर यांनी विजय मिळविला. काम करणाऱ्यांच्या मागे मतदार उभा राहतो, हे या ग्रापंचायत निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट झाल्याचे दिसून आले.
नागांव ग्रामपंचायत निवडणूकीत शेकापसह इंडिया आघाडीचे एकूण 15 उमेदवार सदस्यपदासाठी तर हर्षदा मयेकर या थेट सरपंच पदासाठी रिंगणात होत्या. यापैकी सरपंच व शेकापच्या 11 सदस्यांनी बाजी मारली. यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेचे परेश ठाकूर, शेकापच्या प्रियंका काठे व निकिता नितीन पाडेकर या विजयी झाल्या. तसेच प्रभाग क्र. 2 मध्ये शेकापचे अनिरुद्ध राणे, रोहिणी घरत तसेच इंडिया आघाडीच्या वीणा पिंपळे, प्रभाग क्र. 3 मध्ये शेकापचे आदेश मोरे, मंगला रवींद्र नागे व शिंदे गटाचे सुरज म्हात्रे, प्रभाग क्र. 4 मध्ये शेकापचे सुरेंद्र नागलेकर, लीना दिलीप म्हात्रे व भाजपची अंकिता शेवडे, प्रभाग क्र. 5 मध्ये शेकापचे निखिल मयेकर, सुप्रिया संजय म्हात्रे व भाजपचे रोहन नाईक विजयी झाले.
नागांवच्या थेट सरपंच म्हणून हर्षदा मयेकर यांनी 2 हजार मतांनी शिंदे गटाच्या उमेदवार रसिका रघूनाथ प्रधान यांना दणदणीत पराभव केला. त्यामुळे शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी आ. पंडीत पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी जि.प. सदस्या चित्रा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच कार्यकर्त्यांनी जल्लोषात विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली.