ग्रामपंचायत विरोधात नागरिक आक्रमक
| माथेरान | वार्ताहर |
स्वच्छ, सुंदर नेरळ प्रतिमेला हरताळ फासला गेला असून, शहरातील अस्वच्छतेवरुन नागरिक ग्रामपंचायतीच्या विरोधात आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. रेल्वे स्थानकाजवळच आजाद बेकरी येथील रस्ता हा रहदारीचा मार्ग आहे. येथूनच राजेंद्रगुरुनगर या नेरळमधील सगळ्यात मोठ्या गृहसंकुलात जाण्यासाठी देखील रस्ता आहे. त्यामुळे हा मार्ग कायम पादचारी यांच्याकडून व्यस्त असतो. मात्र गेले अनेक वर्षे हा रस्ता केलाच नसल्याने येथील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. तर येथील नागरी वस्तीत रस्त्यावर गटाराचे पाणी साचले असून बाजूलाच कचऱ्याचा ढीग लागत असतो. तर हा कचरा उचलायला नेरळ ग्रामपंचायतीची गाडी येत नसल्याने त्यातून दुर्गंधी सुटून येथूल चालणाऱ्या नागरिकांचे नाक मुठीत धरून चालावे लागते. अनेकदा ग्रामपंचायतीला तक्रारी करून ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने येथील नागरिक आता आक्रमक होत रस्त्यावर आले आहेत. तसेच सुविधा मिळण्यासाठी आंदोलन करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
नेरळ ही जिल्ह्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे. आर्थिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने देखील नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार मोठा आहे. येथील कर्मचारी संख्या देखील जास्त आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेने नेरळ जोडले गेले आहे. त्यामुळे मागील काही काळात येथे नागरीकरण झपाट्याने होत आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार नेरळ शहराची लोकसंख्या 18 हजार 429 एवढी होती. परंतु सद्यस्थितीत झपाट्याने वाढत असलेला परिसर व वाढत्या लोकसंख्येचा विचार करता सद्यस्थितीत नेरळची लोकसंख्या अंदाजे 40 ते 50 हजाराच्या आसपास जाऊन पोहोचली आहे. तर येथील गाव हा शहरीकरणाकडे झुकला असल्याने येथील नियोजनासाठी नेरळ संकुल विकास प्राधिकरणाची निर्मिती नगररचना विभागाने केली होती.असे असताना देखील सध्या नेरळ ग्रामपंचायतीला नाकापेक्षा मोती जड झाल्याचे चित्र आहे. नेरळ शहराच्या मध्यभागी असलेल्या नेरळ रेल्वे स्थानकाजवळ नेरळ येथील जुन्या आजाद बेकरी रस्ताची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून चालणे नागरिकांना जोखमीचे झाले आहे. गेले अनेक वर्षे हा रस्ता बनवण्यात आलेला नाही. त्यामुळे परदेशी यांच्या घराजवळील मोरी फुटली आहे. तर पुढे कचऱ्याचे ढीग साठून राहत असल्याने कचऱ्याची मोठी दुर्गंधी सुटते. तसेच हिंस्र श्वान, कावळे यांची रेलचेल असल्याने लहान मुलांना चालणे जोखमीचे होत आहे. तसेच येथे सोनोग्राफी सेंटर आहे. त्यामुळे रुग्ण याठिकाणी येत असतात. मात्र येथून येण्याचा मार्ग हा अत्यंत निमुळता असल्याने आणि अवैध पार्किंगचा रस्त्याला विळखा पडत असल्याने रुग्णांना घेऊन येणाऱ्या रिक्षा यायला अडचण निर्माण होते. तर रुग्णवाहिका देखील यायला रस्ता नसल्याने काही नागरिकांच्या जीवावर बेतले असल्याचे भयावह वास्तव आहे.
याबाबत नेरळ ग्रामपंचायतीला अनेकदा सांगून सुद्धा आमचा विचार केला जात नाही. आम्ही माणसं नाहीत का असा जळजळीत प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. तर आता रस्ता, गटार, स्वच्छ परिसर या सुविधा ग्रामपंचायतीने आम्हाला दयाव्यात हा आमचा मूलभूत अधिकार आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. तेव्हा आता ग्रामपंचायतीला जाग येणार कि नागरिकांना हक्कासाठी आंदोलन करावे लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.