ढोलकी व्यवसायिकांना सुगीचे दिवस

। कोलाड । वार्ताहर ।

सध्या ढोलकी व्यवसायिकांना सुगीचे दिवस आले असून ऐन सणासुदीच्या काळात ढोलकी व्यवसायिक व्यवसायात मग्न असल्याचे दिसून येत आहे.

गणेशोत्सव, गौरी पूजन आदी महत्त्वाच्या सण समारंभात ढोलकीला विशेष महत्त्व असते. या काळात ढोलकीला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने ढोलकी व्यवसायिक देखील कसब पणाला लावून सुंदर व आकर्षक ढोलक्या बनविताना दिसून येत आहेत.

कलगी तुरा, नाचाच्या ढोलक्या, हरिपाठ, भजन व किर्तनासाठी लागणारे पखवाज, आरतीसाठी लागणारी ढोलकी, महिलावर्गाच्या नाचाच्या ढोलक्या, लहान मुलांसाठीची ढोलकी आदी विविध प्रकारच्या ढोलक्यांना उत्सव काळात मोठी मागणी असते. यामध्ये ढोलकी दुरूस्ती, नवीन ढोलकी तयार करणे, ढोलकीला शाई लावणे, ढोलकीची बांधणी करून बाहेरील बाजूस आवश्यकता वाटल्यास व्यवस्थितरित्या रंगरंगोटी करणे आदी कौशल्याची कामे या व्यवसायिकांना व कारागिरांना करावी लागत आहेत. सध्या सण समारंभाचे दिवस सुरू झाल्याने कारागिरांना क्षणाचीही उसंत मिळत नसल्याची प्रतिक्रिया कोलाड येथील एका व्यवसायिकांनी दिली आहे.

Exit mobile version