जरांगेबाबत सरकारची भूमिका बदलली?

जालना दगडफेक प्रकरणी एका आरोपीला अटक

| जालना | वृत्तसंस्था |

अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणादरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश बेदरे या आरोपीला अटक केली आहे. यांच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आलं आहे. अंतरवाली सराटीतील लाठीमार प्रकरणी जालना अधीक्षकांवरची कारवाई बाजूला ठेवून त्यांना पुण्यात नियुक्ती देण्यात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी दगडफेक प्रकरणातील आरोपीला अटक झाल्याने राज्य सरकारच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसते आहे. कट रचून पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व त्यांच्यावर हल्ला करणे आदी प्रकरणी बेदरे याच्याविरुध्द गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध घेत असताना तो शुक्रवारी इतर दोन साथीदारांसह आढळून आला होता. पोलिसांनी त्यांच्यावर 307 कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, त्याला शनिवारी न्यायालयापुढे हजर केले असता दोन डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

जरांगे हे 29 ऑगस्टपासून अन्य दहा जणांसह उपोषणाला बसले होते. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी इस्पितळात भरती व्हावे असे प्रशासन व पोलिसांचे म्हणणे होते. आंदोलकांचा मात्र त्याला विरोध होता. त्यातूनच एक सप्टेंबर रोजी वातावरण चिघळले व स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी त्याला जबाब म्हणून लाठीमार केला व त्यात अनेक जण जखमी झाले. जरांगे व आंदोलकांनी मात्र पोलिसांनी जबरदस्ती व लाठीमार केल्यानेच स्थानिकांनी दगडफेक केल्याचा दावा सातत्याने केला आहे. लाठीमाराच्या घटनेचे राज्यभर हिंसक पडसाद उमटल्याने जरांगे एकदम प्रसिध्दीच्या झोतात आले. त्यामुळे गेले दोन महिने मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. त्यावेळी दगडफेक करणाऱ्यांवर कोणतीही पोलिसी कारवाई केली जाऊ नये अशी जरांगे यांची मागणी होती व सरकारने ती यापूर्वी मान्य केली होती. लाठीमाराचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असा आरोप झाला होता. शिवाय या प्रकरणी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.

आता मात्र दोशी यांना पुण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. शिवाय त्याच्या दुसऱ्याच दिवशी दगडफेक प्रकरणी आरोपींना अटक झाली आहे. दोशी यांची नियुक्ती स्थगित ठेवावी असे पत्र शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले होते. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील शिंदे गटाची नाराजी समोर आली होती.

जरांगे संतप्त
दरम्यान, बदरे याच्या अटकेबाबत जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अटक करण्यात आली आहे, असे त्यांचे म्हणणे असून घटनेनंतर दोन महिन्यांनी आमच्या लोकांना अटक करण्याचा हा कोणता डाव आहे, असा सवाल त्यांनी विचारला आहे. अंतरवाली सराटीत आमच्यावर हल्ला झाला होता, आम्ही कट रचलेला नव्हता याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
नियमानुसार कारवाई- अजित पवार
दरम्यान या अटकेबाबत आपल्याला माहिती नाही. मात्र सरकार नियमानुसार कारवाई करील अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नोंदवली आहे.
Exit mobile version