| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
पनवेलमधील अमरधाम ते खांदा कॉलनी येथील एसकेटी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वारंवार तक्रारी करूनही या रस्त्याची दुरुस्ती झाली नव्हती. मात्र, उद्या एसकेटी महाविद्यालयात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी अचानक रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. विशेष म्हणजे, हे काम पनवेल महानगरपालिकेकडून नव्हे, तर टीआयपीएल कंपनीमार्फत करण्यात येत असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे सामान्य नागरिकांसाठी नाही, तर केवळ व्हीआयपींच्या दौऱ्यापूर्वीच प्रशासन जागे होते का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अनेक दिवस दुर्लक्षित राहिलेल्या रस्त्याची दुरुस्ती मंत्र्यांच्या आगमनाच्या पूर्वसंध्येलाच करण्यात आल्याने पनवेल महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या दैनंदिन सुरक्षिततेपेक्षा मान्यवरांच्या दौऱ्यांना अधिक प्राधान्य दिले जात असल्याची भावना व्यक्त होत असून, रस्त्यांची देखभाल ही केवळ व्हीआयपी भेटीपुरती मर्यादित न ठेवता नियमितपणे करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.







