जिल्हास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेत मेहेंदळे हायस्कूलची हॅटट्रिक

| रोहा । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी आणि संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव तालुका सुधागड यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा 13 व 14 डिसेंबर रोजी आयोजित केल्या आहेत. 13 डिसेंबर रोजी झालेल्या मुलांच्या खो-खो क्रिडा स्पर्धेत रोहा कोएसोचे मेहेंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विजयाची घोडदौड कायम ठेवत सलग तिसर्‍यांदा प्रथम क्रमांक मिळविला.

यावेळी झालेल्या सामन्यांमध्ये मेहेंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने पहिल्या फेरीत सुधागड संघाचा एक डाव 18 गुणांनी, दुसर्‍या फेरीत पोलादपूर संघाचा एक डाव 11 गुणांनी, तिसर्‍या फेरीत पेण संघाचा एक डाव 11 गुणांनी पराभव करून अंतिम सामन्यात बलाढ्य मुरुड संघाचा देखील एक डाव व तीन गुणांनी दारूण पराभव करत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.

जिल्हास्तरीय खो-खो सामने खेळताना विद्यालयातील खेळाडूंनी वरील सर्व संघांना एक डाव राखून विजय मिळविल्यामुळे व उत्तम असे यश संपादन केल्यामुळे शाळा समिती चेअरमन संदीप गांगल, प्राचार्य रमेश मोसे, के आर पाटील, संग्राम गायकवाड यांनी अभिनंदन करून विभागीय स्तरावर होणार्‍या खो-खो क्रीडा स्पर्धेत देखील उत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सर्व खेळाडूंना शाळेतील शिक्षक अनिल तिरमले,मारुती लोहकरे, सुनंदा पाटील त्याचबरोबर शाळेचा माजी विद्यार्थी व खो-खो प्रशिक्षक विक्रांत शिंदे यांनी उत्तमरीत्या मार्गदर्शन करत सहकार्य केले.

Exit mobile version