। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
हरियाणाच्या झज्जरमध्ये उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या कार्यक्रमाला विरोध करणार्या शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याच्या फवार्याचा वापर केला. या हिंसक घटनेनंतर हरियाणातल्या मनोहर लाल खट्टर सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारी सकाळीच मोठ्या संख्येत महिला आणि पुरुष आंदोलक हातात झेंडे घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम स्थळाकडे जाताना दिसून आले. परंतु, पोलिसांकडून या आंदोलकांना रोखण्यात आलं. या घटनेचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत शेतकर्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या टँकरच्या मदतीनं आंदोलकांवर पाण्याचा मारा केला. यानंतर आंदोलक मागे हटले नाहीत. त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला. पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड्सही उभारण्यात आली होती. परंतु, आंदोलकांनी ही बॅरीकेडसही उचलून रस्त्याच्या बाजुला फेकून दिली. हरियाणात आंदोलक शेतकर्यांना रोखण्याचे सगळे प्रयत्न अपुरे पडताना दिसून येत आहेत.
याआधी, पीक खरेदी प्रक्रिया सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय तसंच कृषी कायद्यांना विरोध करत शेतकर्यांकडून राज्यातील भाजप सरकारला इशारा देण्यात आला होता. उद्यापासून (2 ऑक्टोबर) खरेदी सुरू केली जावी अन्यथा परवा तुमचे आमदार, खासदार, नेत्यांना घराबाहेर पडता येणार नाही, असं म्हणत शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी थेट हरियाणातल्या मनोहर लाल खट्टर सरकारला खुलं आव्हान दिले आहे.