पवारांचे घर फोडणाऱ्यांचेही घर फुटले
जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
| मुंबई| प्रतिनिधी |
अजित पवारांनी 2019 साली जे बंड केले, त्यामध्ये खासदार सुनील तटकरे यांचा मोठा हात होता. त्यांनीच पवारांचे घर फोडले.‘पवारांचे घर फोडणाऱ्या तटकरेंचेदेखील घर अखेर फुटले. जे पेरले तेच उगवले असा हल्लाबोल शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर केला.
रायगडचे पालकमंत्रीपद जितेंद्र आव्हाड यांना देणार होते. मात्र अजित पवारांमुळे शक्य झाले नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजूला घेऊन सांगितल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. अजित पवारांना वेगळ्या मार्गावर नेण्यामध्ये सुनील तटकरेंचा मोठा वाटा आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. आता तटकरे यांच्या घरात भाऊ-बहिणीमध्ये भांडण सुरु आहे. जे पवार कुटुंबात पेरलं, तेच तटकरेंच्या घरात देखील उगवलं, असंही आव्हाड यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सुनील तटकरे यांना काय कमी केले. सर्व मंत्रीपदे त्यांच्या घरातच दिली. तटकरेंच्या घरात आलेले ऐश्वर्य, प्रतिष्ठा ही शरद पवारांमुळे आल्याचेही ते म्हणाले. जितेंद्र आव्हाडांनी मुंबईत झालेल्या नुकत्याच एका कार्यक्रमात रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा समाचार घेतला. त्यांनी पालकमंत्री पद मिळविण्यापासून पवार कुटूंंबियांना वेगळे करण्यापर्यंत कशा पध्दतीने षडयंत्र केले याचा पाढाच वाचून दाखविला. यावरुन सुनील तटकरे यांच्या या भूमिकेबाबत शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किती नाराजी आहे, हे यावरुन स्पष्ट झाले.