। पालघर । प्रतिनिधी ।
विरार येथील मामा नगर परिसरात इमारतीच्या सदनिकेत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहे. अखिलेश विश्वकर्मा असं मृत व्यक्तीचे नाव असून त्यांनी कर्जबाजारी झाल्याने स्वत:ला पेटवून घेतलेल्या ही दुर्घटना झाल्याची माहिती समोर येत आहे.
विरार पूर्वेच्या मामानगर परिसरात अरुण दीप प्लाझा इमारत आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावरील एका सदनिकेला शनिवारी रात्री अचानक आग लागली होती. या घटनेची माहीती तातडीने वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र सदनिकेत लागलेल्या आगीत तीन जण होरपळले आहेत. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सदनिकेत लागलेली आग ही अखिलेश विश्वकर्मा याने स्वतःच लावली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. कर्जबाजारी झाल्याने त्यानेच स्वतःला पेटवून घेतले आहे. मात्र यात त्यांना वाचविण्यासाठी गेलेले अन्य दोन जण जखमी झाले.







