पदवीधरांचे आमदार आहेत कुठे? पदवीधरांचा सवाल
। नेरळ । प्रतिनिधी ।
कोकण पदवीधर मतदारसंघात (दि.26) जून रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात सलग तिसर्यांदा निरंजन डावखरे हे पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. मात्र मागील सहा वर्षे विधानपरिषद सदस्य असलेले निरंजन डावखरे यांनी कर्जत तालुक्यासाठी काय केले? असा थेट प्रश्न पदवीधर मतदार विचारत आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. जून 2018 मध्ये या मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीनंतर आमदार बनलेले निरंजन डावखरे यांच्या विजयात कर्जत तालुक्याचा मोठा वाटा राहिला होता. मात्र निवडून आल्यावर विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी कर्जत तालुक्यासाठी काय केले? असा प्रश्न सहा वर्षांनी सर्वसामान्य लोक आणि मतदार उपस्थित करीत आहेत.
सहा वर्षे आमदार राहिल्यावर निरंजन डावखरे यांची आमदारकीची मुदत या महिन्यात संपत आहे. अशावेळी कोकणातील सर्व सहा जिल्ह्यात जाऊन वेळ देणे हे जरी कठीण असले तरी वर्षातून किमान एक फेरी आपल्याला मतदान केलेल्या पदवीधर यांच्यासाठी घेतलेली दिसत नाहीत. सहा वर्षांच्या काळात जेमतेम तीन वेळा विविध कार्यक्रमांसाठी निरंजन डावखरे उपस्थित राहिलेले दिसले.त्यामुळे पदवीधर मतदार दरवेळी आपले आमदार कुठे आहेत असा प्रश्न सातत्याने उपस्थित करायचे.
मात्र दुसरीकडे कर्जत तालुका हा निरंजन डावखरे यांचे निवास स्थान असलेल्या ठाणे शहरापासून उपनगरीय लोकल ने सव्वा तासावर आहे. असे असतानादेखील आमदारांचे पाय कर्जत तालुक्यात सहा वर्षात सहावेळादेखील लागले नाहीत. सहा जिल्हांचा मतदारसंघ असल्याने साहजिकच निधी वाटपात अन्याय होणार, पण सहा वर्षात दरवर्षी एक काम याप्रमाणे सहा विकास कामे कर्जत तालुक्यात निरंजन डावखरे मंजूरदेखील करू शकले नाहीत. त्यामुळे सहा वर्षांनी पुन्हा निरंजन डावखरे हे पदवीधर मतदार यांचे प्रश्न कसे ऐकले जाणार ? हा प्रश्न देखील त्यांच्या कधीही न दिसण्याने उपस्थित केला जात आहे. कर्जत तालुक्यात आपला विकास निधी देण्यासाठी हात आखडता घेणार्या निरंजन डावखरे यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात साधे दर्शन देण्याचे टाकणार्या निरंजन डावखरे यांना कोकण पदवीधर मतदारसंघात कर्जत तालुक्यातील मतदार यांना कसे आपलेसे करतात. याकडे महायुती मधील घटक पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पदवीधर मतदारसंघात होणार आहे. कर्जतचे लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता महायुतीचे नेते पुन्हा हातात हात घालून एकत्र दिसण्याची शक्यता फार कमी आहे. त्याचा फायदा महाविकास आघाडी उचलण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणा महायुतीच्या घटक पक्षांनी आपापल्या पक्षांच्या कार्यालयातून राबवली. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघातदेखील अशीच स्थिती राहणार आहे.