रेशन दुकानधारकांना ‘पॉस’ची डोकेदुखी

डाटा न मिळाल्याने वितरणात अडचणी
महिनाअखेर होऊनही धान्य मिळेना
शिधापत्रिकाधारकांतून नाराजीचे सूर
मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरूड शहरात चार स्वस्त धान्य दुकाने असून, या दुकानांतून दर महिना संपूर्ण शहरातील सर्व शिधापत्रिका असणार्‍यांना पॉस मशीनद्वारे धान्य वितरण केले जाते. परंतु, चालू महिना संपत आला तरी अजूनपर्यंत सर्व शिधापत्रकधारकांना रेशन दुकानदारांवर धान्य न मिळताच परतावे लागत असल्याने समस्त जनतेमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्वस्त धान्य दुकानांतून होणारा काळा बाजार रोखण्यासाठी राज्यातील दुकानदारांना पॉस मशीन देण्यात आल्या; परंतु संध्या या मशीन रेशनिंग दुकानधारकांना डोकेदुखी ठरत आहे. या पॉस मशीनद्वारे प्रत्येक शिधापत्रकधारकाचा अंगठा घेतल्यावर नेमक्या त्याच व्यक्तीस धान्य वितरित केले जाते. अचूकता व त्याच व्यक्तीस धान्य या मशीनमुळे होत असते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून पॉस मशीनमध्ये कळंबोली (पनवेल) येथील एफ.सी.आय. येथून ऑनलाईन धान्य वितरणाचा डेटा न टाकल्यामुळे सदरील वाटप ठप्प असून, सर्व शिधापत्रकधारकांना मागील काही दिवसापासून धान्य मिळेनासे झाले आहे. त्यामुळे बरेच शिधापत्रकधारक रेशन दुकानात जाऊन हेलपाटे घालून न धान्य घेता रिकाम्या हाताने त्यांना परतावे लागत आहे. ऑगस्ट महिना संपावयास काही दिवस शिल्लक राहिले आहेत.तर, त्यात येणार्‍या सार्वजनिक सुट्ट्यांमुळे या महिन्यांचे धान्य मिळणार की नाही, हा मोठा प्रश्‍न या ठिकाणी निर्माण झाला आहे.

पॉस मशीनमध्ये कळंबोली (पनवेल) येथील एफ.सी.आय. येथून ऑनलाईन धान्य वितरणाचा डेटा न टाकल्यामुळे ही समस्या उद्भवली असून, ती रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भेडसावत आहे. येत्या दोन-तीन दिवसात या समस्येचे निराकरण होऊन सुरळीत धान्य वितरित होईल.
सचिन राजे, अव्वल कारकून, पुरवठा शाखा

मुरुड तहसीलदार कार्यालयातील पुरवठा शाखेतून सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना सर्व शिधापत्रकधारकांसाठी धान्य वितरणाकरिता आमच्याकडील दुकानांमध्ये धान्य जमा झाले आहे. परंतु, पॉस मशीनमध्ये धान्य वितरणाचा डेटा न टाकल्याने सर्व शिधापत्रकधारकांना धान्य वितरण करता येत नाही.
गिरीश साळी, तालुका अध्यक्ष, स्वस्त धान्य रेशनिंग दुकानधारक

Exit mobile version