सॉफ्टवेअर अपडेटेशनमुळे ई-पॉजवर झाला होता परिणाम
। अलिबाग । भारत रांजणकर ।
नव्या सॉफ्टवेअरचे अपडेटेशन सुरु असल्याने ई-पॉज मशीनवर धान्याची नोंदच दुकानदारांना करता येत नसल्याने जिल्ह्यातील सुमारे साडेपाच लाख शिधापत्रिका धारक व 17 लाख 50 हजार लाभार्थी तब्बल 10-12 दिवसांपासून धान्यापासून वंचित झाले होते. देशपातळीवर संपूर्ण तांत्रिक अडचणी दुर करुन हा गोंधळ संपवून आज 12 व्या दिवसांपासून रेशनिंगवर धान्य सुरळीत सुरु झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी दिली.
रायगड जिल्ह्यात दोन हजार महसुली गावे आहेत. त्यात पाच लाख 39 हजार 822 रेशन कार्ड आहेत; तर 17 लाख 51 हजार 314 लाभार्थी आहेत. ई-पॉस मशीनच्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून धान्य वाटप केले जाते. यासाठी पुरवठा विभागाकडून वापरण्यात येणार्या आरसीएमएस सॉप्टवेअर अद्यावतीकरण सुरु करण्यात आले होते. मात्र, याची कोणतीही कल्पना रेशन दुकानदारांना न दिल्याने धान्य वाटपात गोंधळ उडाला होता. ई-पॉस मशीन सुरू केल्यानंतर त्यात ग्राहक क्रमांक म्हणजेच आरसी नंबर टाकले जाते. यानंतर मशीनमध्ये संबंधित कार्डधारकाचा धान्याचा कोटा येतो. या प्रक्रियेनंतर मशीन लगेच बिल दाखविते. परंतु सध्या ई-पॉस मशीन बिल दाखवितच नव्हेत. सात ते आठवेळा प्रयत्न केल्यानंतर बिल निघत नसल्यामुळे बिलशिवाय धान्य वाटप करणे शक्य नव्हते. ट्रान्झक्शनची माहितीही दुकानदारांना देत येत नसल्यानेअनेक दुकानदारांना सुरुवातीचा धान्याचा कोटा देखील दिसत नाही परिणामी किती धान्य वाटप झाले ते माहित होत नव्हेते. यामुळे दुकानदारांच्या अडचणी वाढत ते धान्य वाटप करू शकत नव्हते. धान्य मिळत नसल्याने महिन्याच्या शेवटी धान्य घेण्यासाठी येणार्या अनेक कार्डधारकांना रेशन न घेताच परत जावे लागत होते. यावर जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी युद्धपातळीवर अपडेशनचे काम सुरु होते त्यामुळे संपूर्ण देशपातळीवर ही समस्या उद्भवली होती. सर्व तांत्रिक समस्या आता संपूष्टात आल्या असून सर्व रेशनिंग दुकानावर धान्य वाटप सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.