उरणमधील सरकारी अधिकार्‍यांना मुख्यालयाचे वावडे

। उरण । वार्ताहर ।
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. मात्र या नियमाला बगल देत उरणमधील शासकीय अधिकारी आपापल्या घरीच राहणे पसंत करीत आहेत. जिल्हा परिषदच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना निर्देश देऊन सर्वांनी मुख्यालयी राहण्याचे व सुट्टीच्या दिवशी अथवा अन्य दिवशी मुख्यालय सोडण्याचे झाल्यास पूर्व परवानगी घेऊनच सोडावेत असे लेखी आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन 2005 कायद्याअंतर्गत कारवाई प्रस्तावित केली जाईल याची नोंद घ्यावी असे लेखी पत्राद्वारे आदेश दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या या आदेशाला केराची टोपली दाखवीत सर्व शासकीय अधिकारी मुख्यालय सोडून आपल्या घरीच राहणे पसंत करीत आहेत. मागील वर्षीसुद्धा हीच हालत होती. जिल्हा परिषदेचा आदेश येऊनही त्याचे उल्लंघन उरणमधील शासकीय अधिकारी वर्गाकडून होत असतानाही आजतागायत जिल्हा परिषद मार्फत कोणावरही कारवाई झाल्याचे दिसत नाही. यामुळेच उरणमधील शासकीय अधिकारी अशा आदेशाला केराची टोपली दाखवून आपल्या मर्जीनुसार काम करीत आहेत. उलट असे किती आदेश आलेतरी आमचे कोणीच वाकडे करू शकत नाही अशी दरपोक्ती उरणमधील काही शासकीय अधिकारी वर्ग करीत आहे.

Exit mobile version