। अलिबाग । प्रतिनिधी ।
येथील अलिबाग लायन्स क्लब आणि अलिबाग नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायक्लोथॉनचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते उद्घाटन, तर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते सहभागी सायकलस्वारांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत सदर उपक्रमाचा मुख्य उद्देश आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देऊन जनजागृती करणे हा असल्याचे आयोजकांनी सांगितले. पंचेचाळीस, तीस आणि सोळा किलोमीटर अंतराच्या तीन गटाच्या या रॅलीमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा न ठेवता सहभागी होण्यावर भर दिला गेला. सहभाग घेऊन रॅली पूर्ण करणार्या तिन्ही गटातील एकूण तीनशे सव्वीस सायकलस्वारांना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सायकलचा आरोग्य आणि पर्यावरणाशी सहसंबंध सांगून लायन्स अलिबागच्या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी पर्यावरण रक्षणासाठी बांबूची लागवड अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगताना, शोभेच्या वस्तू, उपजीविकेचे साधन, धूपप्रतिबंध, निसर्गाचा समतोल राखण्यात मोलाचे योगदान असणार्या बांबूची लागवड लायन्स क्लब अलिबागने मोठ्या प्रमाणावर करावी, असे सूचवले. ही वनस्पती गवतवर्गीय असल्याने, तोडणीसाठी विशेष परवानगीची आवश्यकता नसल्याचे सांगितले.







