। उरण । प्रतिनिधी ।
वनवासी कल्याण आश्रम उरण आणि डॉक्टर हळदीपूरकर यांचे लक्ष्मी आय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, इंडियन फार्मासुटिकल असोसिएशन यांच्यावतीने आरोग्य मार्गदर्शन आणि मोफत हिमोग्लोबिन, रक्त शर्करा तपासणी, औषधे वाटप शिबीर उरणमधील जांभूळपाडा मराठी शाळेत आयोजित करण्यात आले होते.
यावेळी जांभूळपाडा वाडीतील, गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील 120 रुग्णांचे डोळे तपासण्यात आले. त्यामध्ये 22 जणांना मोतीबिंदू आढळले. त्यातील 16 रूणांना त्याच दिवशी पनवेल येथे लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट येथे शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. इंडियन फार्मासुटिकल असोसिएशनच्यावतीने रुग्णांचा रक्तदाब आणि रक्त शर्करा तपासण्यात आली. ज्या रुग्णांना हिमोग्लोबिन कमी आहे त्या सगळ्यांना मोफत हिमोग्लोबिन वाढण्यासाठी औषधे देण्यात आली.
यावेळी इंडियन फार्मसी असोसिएशन महाराष्ट्र शाखा सेक्रेटरी नितीन मनियार, आय.पी.ए. महाराष्ट्र शाखाउपाध्यक्ष सतीश शहा, विजयकुमार घाडगे , शशिकांत रासकर, उमाकांत पानसरे, विश्वनाथ पाटील, बळीराम पेणकर, लक्ष्मी इन्स्टिट्यूटचे कँप को ऑर्डीनेटर विनोद पाचघरे, डॉ.मित पिलिमकर, डॉ.भूषण रांगरे, वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांत महिला प्रमुख सुनंदा वाघमारे, जिल्हा हितरक्ष प्रमुख श्रीमती मीरा पाटील उपस्थित होत्या.