| रायगड | वार्ताहर |
गुणवत्तापूर्ण पीएच.डी. संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ‘पीएच.डी. एक्सलन्स सायटेशन्स’ हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत दरवर्षी विविध शाखांतील दहा पीएच.डी. प्रबंधांची पुरस्कारासाठी निवड केली जाणार असून, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीतील प्रबंध विचारात घेतले जाणार आहेत.
यूजीसीने या संदर्भातील मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. गुणवत्तापूर्ण पीएच.डी. संशोधकांची दखल घेणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे. त्यानुसार अभियांत्रिकी, विज्ञान, समाजशास्त्र, भाषा अशा विद्याशाखांतील संशोधन प्रबंध पुरस्कारासाठी निवडले जाणार आहेत. संशोधनाचा अत्युच्च दर्जा दर्शवत ज्ञान, संशोधन पद्धती, स्पष्टता, परिणाम आणि परिणामकारक सादरीकरण हे घटक विचारात घेतले जाणार आहेत. पुरस्कार निवडीसाठीची प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. त्यासाठी विद्यापीठ स्तरावर आणि यूजीसी स्तरावर निवड समिती असणार आहे.
पीएच.डी. प्रबंधाला पुरस्कार देण्याच्या उपक्रमातून देशातील विद्यापीठांमध्ये केल्या जाणार्या संशोधनाला आणि विविध विद्याशाखांतील संशोधकांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. प्रत्येक विद्यापीठाला 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या वर्षभराच्या कालावधीत पदवी प्रदान समारंभात पीएच.डी. प्रदान केलेले पाच विद्याशाखांतील पाच प्रबंध पुरस्कारासाठी नामांकित करता येणार आहेत. पुरस्कार प्रदान कार्यक्रम शिक्षक दिनी (5 सप्टेंबर) होणार आहे. दरम्यान, पीएच.डी. संशोधनाला पुरस्कार देणे ही चांगली कल्पना आहे. मात्र, त्यासाठीची निवड अत्यंत काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. चांगल्या दर्जाच्या पीएच.डी. संशोधनाला पुरस्कार मिळाल्यास अन्य चांगल्या संशोधकांना प्रोत्साहन मिळेल. त्या दृष्टीने हे पाऊल सकारात्मक आहे, असे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. भूषण पटवर्धन यांनी सांगितले.
पीएच.डी. प्रवेशांत वाढ
यूजीसीने केलेल्या अभ्यासानुसार पीएच.डी. प्रवेशांकडील कल वाढत असल्याचे दिसून आले आहे. 2010-11 मध्ये 77 हजार 798 विद्यार्थ्यांनी पीएच.डी.ला प्रवेश घेतला होता. तर 2017-18 मध्ये 1 लाख 61 हजार 412 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यामुळे आठ वर्षांमध्ये प्रवेश दुपटीने वाढले. पीएच.डी.च्या आकडेवारीचा आढावा घेतला असता विज्ञान शाखेत 30 टक्के, त्यानंतर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेत 26 टक्के, समाजशास्त्रात 12 टक्के, भारतीय भाषांमध्ये 6 टक्के, व्यवस्थापन आणि शिक्षण या शाखेत 5 टक्के, कृषिशास्त्रात 4 टक्के, वैद्यकीय शाखेत 5 टक्के, वाणिज्य शाखेत 3 टक्के, तर परदेशी भाषांमध्ये 3 टक्के विद्यार्थी पीएच.डी करत असल्याचे या अभ्यासातून निदर्शनास आले आहे.