। चिरनेर । प्रतिनिधी ।
भारतीय नौदलाच्या नेव्ही विक सेलिब्रेशन 2024 चा एक भाग म्हणून, आयएनएचएस संधानी आणि नेव्हल स्टेशन करंजा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच उरण एज्युकेशन सोसायटी इंग्लिश स्कूलच्या पलक मैदानावर आरोग्य शिबीर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन सर्जन रिअर अॅडमिरल दिलीप राघवन, कमांडिंग ऑफिसर, आयएनएचएस अश्विनी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी, कमोडोर सी. रामी रेड्डी, उरण एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष तनसुख जैन तसेच अन्य सदस्य उपस्थित होते. या शिबिरात उरण आणि आजूबाजूच्या गावातील रहिवाशांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी रुग्णांची आरोग्य तपासणी तसेच आरोग्य सल्ला आणि औषधे मोफत देण्यात आली. शिबिरात 500 हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, दंतवैद्य आणि त्वचारोग तज्ञ अशा विविध आजारांवरील वैद्यकीय अधिकार्यांनी रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच, या शिबिरात रक्त तपासणी, डोळे तपासणीदेखील करण्यात आली.