| वावोशी | प्रतिनिधी |
हुमाना पीपल टू पीपल इंडिया संस्था आणि मर्क स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या प्रकल्प निरामायामार्फत खोपोली परिसरात आरोग्य जनजागृतीसाठी सक्रीय कार्य सुरू आहे. महिलांचे व किशोरवयीन मुलींचे गट तयार करून त्यांना दर महिन्याला आरोग्य प्रशिक्षण देणे, तसेच किशोरवयीन मुलींसाठी मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. बुधवारी (दि.10) खोपोली नगरपरिषद उर्दू शाळा, हाळ बुद्रुक येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात गर्भाशयाच्या मुखाची तपासणी, स्तन तपासणी, मधुमेह व रक्तदाब तपासणी अशा विविध चाचण्या करण्यात आल्या. हाळ बुद्रुक येथील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या उपक्रमात प्रकल्प निरामाया, मुंबईखोपोली परियोजनेचे प्रोजेक्ट लीडर विठ्ठल ठाकरे, हेल्थ ॲक्सिलरेटर सरीता पेदाम आणि कम्युनिटी मोबिलायझर रविना गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच स्त्रीरोग तज्ञ डॉ. तृप्ती पोयरेकर आणि कर्करोग तज्ञ डॉ. सिमरन थोरात यांनी महिलांची सविस्तर तपासणी करून आवश्यक ते योग्य मार्गदर्शन दिले.







