वातावरण बदलामुळे आरोग्य समस्या

| तळा | वार्ताहर |

सध्या वातावरणात उष्णतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून वाढत्या उष्णतेचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे. काही दिवसांपूर्वी पडलेल्या कडकडीत थंडीनंतर अचानक हवेतील उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वारंवार उन्हातून फिरल्यामुळे शरीरातून घाम येऊन त्वचेचे विकार होण्याची देखील शक्यता आहे. दिवसा कडक उन्हाच्या झळा तर रात्री गारटा पडत असल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.

काय काळजी घ्यावी
वाढत्या उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ज्यामध्ये दुपारी बारा ते चार शक्यतो घरातून बाहेर पडणे टाळावे, अगदीच महत्वाच्या कारणासाठी बाहेर पडावे लागल्यास स्त्रियांनी चेहऱ्याला स्कार्फ अथवा ओढणी बांधावी तर पुरुषांनी रुमालाचा वापर करावा. यांसह टोपी किंवा छत्री घेऊन बाहेर पडावे. मोटारसायकल वरून प्रवास करताना गॉगल चा वापर करावा, शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, ऊसाचा रस, लिंबू सरबत, कोकम सरबत यांचे सेवन करावे तसेच कलिंगड, मोसंबी, संत्री, केळी यांसारखी फळे खावी असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
Exit mobile version