| तळा | वार्ताहर |
शहरासह ग्रामीण भागातही मागील काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ झाली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पावसाळा सुरू असल्याने सध्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर डास आलेले अपल्याला दिसतात. यामुळे डेंग्यू सारखा आजार होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन तळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र मोध्ये यांनी केले आहे.
मानवी लोकसंख्येच्या जवळच्या भागात डासांची वाढ होते. डेंग्यूचा डास घराच्या आत आणि घराच्या आसपासच्या भागात पाण्याने भरलेल्या कंटेनरमध्ये आपली अंडी घालतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. आजूबाजूला पाणी साचले तर ते मातीने भरावे, असे करणे शक्य नसेल तर त्यात रॉकेलचे थेंब टाकावे. पावसाळ्यात उघडे पाणी पिऊ नका. पाणी नेहमी झाकून ठेवा. रात्री झोपताना रोज मच्छरदाणी वापरा. तसेच उघड्या पाण्यात डासांच्या अळ्या निदर्शनास आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना त्याची माहिती द्यावी, जेणेकरून त्या ठिकाणी फवारणी करता येईल. यांसारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन डॉ. मोध्ये यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आले आहे.