| पनवेल | प्रतिनिधी |
अज्ञात सायबर चोरट्याने हॉटेल मालक असल्याचे भासवून ताराचंद इंडस्ट्रीज लिमिटेडच्या पल्लवी अविदा हॉटेलमधील एका सीनियर अकाऊंटण्टला व्हॉट्सॲपद्वारे पैसे पाठवण्यास सांगून तब्बल 38 लाख 30 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हितेश दहिवलीकर (31) हा कळंबोली सेक्टर-10 ई मधील पल्लवी अविदा हॉटेल येथे सीनियर अकाऊंटण्ट म्हणून कार्यरत आहे. नेहमीच्या कामाचा भाग म्हणून हॉटेलचे मालक, हितेशला व्यवहाराचे पेमेंट करण्यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेज करत असतात. याचीच माहिती मिळवून एका सायबर चोरट्याने हॉटेल मालकाच्या नावाने व कंपनीचा लोगो (डीपी) असलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरून हितेशला मेसेज पाठवला. त्यानंतर सायबर चोरट्याने हॉटेल मालक असल्याचे भासवून प्रथम बँक खात्यातील किती रक्कम शिल्लक आहे, याची विचारणा केली. हितेश याने व्हॉट्सॲप नंबरवरील कंपनीचा डीपी पाहिल्यावर ही व्यक्ती हा कंपनीचा मालक आहे, असे समजून कंपनीच्या खात्यात 40 लाख 24 हजार रुपये शिल्लक असल्याची माहिती व्हॉट्सॲपवर पाठवली. त्यानंतर सायबर चोरट्याने हितेशला दोन वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगितले.
मालकाचा आदेश समजून हितेशने जनरल मॅनेजर हंसराज यांच्याशी संपर्क साधून चेक ॲथोराईझ करून घेतले. त्यानंतर पंजाब येथील बँक खात्यात 19 लाख 70 हजार रुपये, तर गुजरात येथील बँक खात्यात 18 लाख 60 हजार रुपये असे एकूण 38 लाख 30 रुपये आरटीजीएसद्वारे ऑनलाइन ट्रान्सफर केले. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर पुन्हा या व्हॉट्सॲप नंबरवरून समोरच्या व्यक्तीने आणखी पैशांची मागणी केली. दरम्यान, हॉटेल मालक तेथे पोहोचल्याने हितेश याला संशय आला व त्याने हॉटेल मालकाकडे या व्हॉट्सॲपद्वारे आलेल्या मेसेजबाबत विचारणा केली. त्यावर मालकाने त्याला कोणताही मेसेज पाठवला नसल्याचे तसेच पैसे पाठवण्यास सांगितले नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे हितेशच्या लक्षात आल्यानंतर त्याने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.






