ग्रामस्थांकडून निषेध करुन बदलीची मागणी; 22 जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा
| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कोमल कराळे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या व खालापूरच्या माजी सरपंच मनोरमा (बेबी) मनोहर साळवी (81) यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी मुख्याधिकारी कोमल कराळे यांच्याविरोधात निषेध व्यक्त करत त्यांच्या बदलीची मागणी करणारे निवेदन नगराध्यक्षा रोशना मोडवे व तहसीलदार यांना देण्यात आले आहे. तसेच संबंधित प्रकरणाची चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्याधिकारी यांची तात्काळ बदली न झाल्यास 22 जूनपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा अतुल साळवी यांनी दिला आहे.
मनोरमा (बेबी) साळवी यांनी खालापूर ग्रामपंचायतीचे सरपंचपद तीन वेळा भूषविले असून तंटामुक्ती समिती, शांतता समिती तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. गुरुवारी (दि. 5 जून) त्या आदिवासी बांधवांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह खालापूर येथील शंकर मंदिराजवळील विहिरीची पावसाळ्यापूर्वी साफसफाई व गाळ काढण्याची मागणी मांडण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात गेल्या होत्या.
मात्र, काही दिवसांपूर्वी घरपट्टीच्या प्रश्नावर गावकऱ्यांनी काढलेल्या मोर्चात सहभागी झाल्याचा राग मनात धरून मुख्याधिकारी कोमल कराळे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी दालनातून बाहेर बसण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच उपस्थित अधिकाऱ्याला त्यांना पाणी देण्यास सांगून दालनाबाहेर जाण्यास सांगितल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ देण्यात आलेल्या निवेदनावेळी नगराध्यक्षा रोशना मोडवे, माजी उपनगराध्यक्ष संतोष जंगम, ज्येष्ठ नेते नवीनचंद्र घाटवळ, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, नगरसेविका सुप्रिया साळुंखे, माजी नगरसेवक उमेश गावंड, माजी उपसरपंच मंदाताई भोसले, महेश राठी, मिलिंद पाटील, दत्ता बुवा चाळके, मनोहर पत्की, हरेश मोडवे, चंद्रकांत पारंगे, उमेश पडवकर, मंगेश चाळके, नितीन बोंडार्डे, विजय भोसले, अतुल साळवी, मनोज साळवी, स्मिता साळवी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना मनोरमा (बेबी) साळवी यांनी सांगितले की, “मी कोणत्याही वैयक्तिक किंवा खासगी कामासाठी मुख्याधिकाऱ्यांकडे गेले नव्हते. सार्वजनिक आरोग्य, पिण्याचे पाणी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित प्रश्न मांडण्यासाठी गेले होते. माझी बाजू समजून घेणे, अर्ज स्वीकारणे किंवा समस्येवर चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र मुख्याधिकारी कोमल कराळे यांनी माझ्याशी अत्यंत अपमानास्पद, असंवेदनशील आणि अयोग्य वर्तन केले.”






