| विम्बल्डन | वृत्तसंस्था |
सर्बियाच्या दुसर्या मानांकित नोव्हाक जोकोविचने अप्रतिम कामगिरी सुरू राखताना विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने ग्रँडस्लॅम स्पर्धेची तब्बल 35 व्यांदा अंतिम फेरी गाठली असून, अशी कामगिरी करणारा तो पहिला पुरुष टेनिसपटू ठरला आहे. शुक्रवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात 23 ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचने आठव्या मानांकित इटलीच्या यानेक सिन्नेरला 6-3, 6-4, 7-6 (7-4) असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.
सामन्यातील पहिला व दुसरा सेट जोकोविचने सहज जिंकला. तिसर्या सेटमध्ये मात्र सिन्नेरने जोकोविचला आव्हान दिले. हा सेट टायब्रेकरवर गेला. परंतु, जोकोविचने खेळ उंचावत विजय साकारला आणि आठव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद मिळवण्याकडे कूच केली. जोकोविचने यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेत जेतेपद पटकावल्यास त्याचे हे हंगामातील सलग तिसरे जेतेपद ठरेल.







