| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातील नागरी प्रश्न घेऊन उपोषण करीत असलेले गोरख शेप यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र, हार्ट पेशंट असलेले उपोषणकर्ते शेप यांची प्रकृती मध्यरात्री ढासळली आणि त्यामुळे कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातून वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेण्यात आले.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीत निर्माण झालेले नागरी प्रश्न आणि ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून गैरव्यवहार झाला असून, त्याची चौकशी करावी. या मागणीसाठी मानवाधिकार माहिती अधिकार कार्यकर्ते गोरख शेप यांनी 28 सप्टेंबर पासून उपोषण सुरू केले आहे. विविध 13 विषय घेऊन उपोषण करीत असलेले गोरख शेप हे हृदयरोगाचे रुग्ण आहेत. त्यांची बायपास झाली असून त्यांनी उपोषण काळात दररोज घेण्याच्या गोळ्यांचे सेवन करणे बंद केले आहे. त्याचा त्रास मध्यरात्री जाणवू लागला आणि त्यांना चक्कर येऊ लागली. त्यावेळी बंदोबस्तात असलेले पोलिसांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातून वैद्यकीय पथक पोहचले. परंतु, बीपी खाली येत असल्याने कळंब येथून डॉक्टर बोलावून घेण्यात आले. कळंब येथून वैद्यकीय अधिकारी डॉ. केवारी तेथे पोहचले आणि त्यानंतर वैद्यकीय तपासण्या झाल्या. यावेळी डॉ. केवारी यांनी सर्व गोळ्या वेळेवर घेण्याचा सल्ला दिला असून, याप्रसंगी नेरळ गावातील शेकडो तरुण उपोषणस्थळी उपस्थित होते.
मध्यरात्रीनंतर उपोषणकर्ते गोरख शेप यांना संपूर्ण बेड रेस्ट घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्याकडून विश्रांती घेतली जात आहे किंवा नाही यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत उपोषणकर्त्याने पूर्ण विश्रांती घेतली आहे. उपोषणाचा तिसरा दिवस असून गटविकास अधिकारी, तहसीलदार, बांधकाम खात्याचे उप अभियंता, प्राधिकरणाचे तांत्रिक अधिकारी यांच्याकडून उपोषणकर्त्यांचा मागणीवर सकारात्मक निर्णय घेतले जातात किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नेरळमधील उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळली
