अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्‍न

स्वच्छते बाबत जनजागृती करण्याचे ग्रामपंचायत समोर आव्हान
| दिघी । वार्ताहर ।
दिघी हे श्रीवर्धन तालुक्यातील महत्वाचे गाव आहे. पारंपारिक मच्छीमारी हा इथला प्रमुख व्यवसाय. दिघीबंदर मुळे ते आणखी चर्चेत आले. असे असताना येथील रस्त्यालगत दिसणार्‍या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

गावाचा विस्तार मोठा आहे. मात्र, ग्रामपंचायतीतर्फे विविध ठिकाणी कचराकुंड्यांची व्यवस्था न केल्याने नागरिक घरातील कचरा रस्त्यावरच फेकून देत असल्याचे दिसते. हा कचरा वेळेत न उचलल्याने परिसरात नेहमीच घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दृष्य दिसून येते. रस्त्यालगत कचरा टाकल्याने तेथे अस्वच्छता निर्माण झाली आहे. साठलेला कचरा वेळच्या वेळी उचलावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. बर्‍याच दिवसांपर्यंत कचरा उचलण्यात येत नसल्यामुळे घाणीची दुर्गंधी आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.

दिघी गावातील सांडपाण्याचा योग्य तो निचरा होत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत दप्तरी अनेक वेळा करण्यात आल्या. या तक्रारींकडे निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी जर प्रत्येक वॉर्डनुसार लक्ष दिले तर अस्वछता होणार नाही. स्वच्छतेसाठी महाराराष्ट्रासह देशात सर्वत्र स्वच्छता अभियान आज राबविण्यात येत असताना मात्र, गावच्या कारभार्‍याकडून दुर्लक्ष होत असल्याने शहराप्रमाणे आता ग्रामीण भागातुन ही कचर्याचे ढिग दिसून येत आहेत .

दिघी येथील विकसित बंदर दिघी पोर्ट हे चर्चेत आहे. पोर्टकडे जाण्यासाठी दिघी गावाला जोडून रस्ता आहे. याच रस्त्याचा वापर शाळेतील मुले, स्थानिक नागरिक व पोर्ट कर्मचारी यांचा सातत्याने होत आहे. मात्र, याच रस्त्याला मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. लहान मुलांना व नागरिकांना नाक मुटीत घेवून ये – जा करावी लागत आहे. त्यामूळे दिघी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे.

शाळे भोवती कचरा
रायगड जिल्हा परिषदच्या दिघी शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळे भोवती असलेल्या दुर्गंधीयुक्त कचर्‍यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

Exit mobile version