कंपनीच्या प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात

माजी आ. पंडित पाटील यांचा आरोप

। अलिबाग । प्रतिनिधी ।

पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीमुळे प्रदूषणाचा धोका वाढला आहे. यामुळे परिसरातील गावांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिक तरुणांना नोकरीतून डावलले जात असून कंपनीच्या अवजड वाहतूकीमुळे रस्ते खराब होऊ लागले आहेत, असा आरोप शेकापचे माजी आ. पंडित पाटील यांनी केला आहे. याबाबत सोमवारी (दि.14) पुनर्वसन उपजिल्हाधिकारी भरत वाघमारे यांची भेट घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीचे दुषित सांडपाणी खाडीत सोडले जात आहे. कंपनीमधून दूषित वायू व धूळ सोडल्याने येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. धरमतर खाडीत खोदकाम करण्यात येत असल्याने भविष्यात बांधबंधिस्ती तुटण्याचा धोकाही नाकारता येत नाही. कंपनी प्रशासनाकडून स्थानिक तरुणांना नोकरीमधून डावलले जात आहे. तसेच, कंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे रस्ते खराब होत आहेत. अलिबाग-पेण मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना तसेच चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कंपनी प्रशासनाकडून सीएसआर निधी वापरताना वाटाण्याच्या अक्षदा दाखवल्या जातात. सांबरी येथील बंधार्‍याची झालेली नुकसान भरपाईचा प्रश्‍न अजूनही मार्गी लावण्यास कंपनी प्रशासन उदासीन आहे. कंपनीची लेबर कॉलनी नसल्यामुळे आजूबाजूच्या ग्रामपंचायतींवर प्रचंड ताण पडत आहे. ग्रामीण भागात नागरिकीकरण वाढल्याने ग्रामपंचायतीला सुविधा पुरवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे, अशा अनेक समस्यांसंदर्भात कंपनीच्या दालनात वेळोवेळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, कंपनी प्रशासनाकडून फक्त गोड बोलून वेळ मारून घेतली जाते. कंपनीचे अधिकारी या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, असा आरोप माजी आ. पंडित पाटील यांनी केला आहे.

पेण व अलिबाग तालुक्यातील शेतकरी, उपविभागीय अधिकारी, खारभूमी अधिकारी, कंपनीच्या जबाबदार व निर्णयक्षम अधिकारी यांना मागील पाच वर्षात कंपनीने सीएसआर फंडातून केलेल्या कामांची माहिती व किती स्थानिक तरूणांना रोजगार उपलब्ध करून दिला त्याची यादीसह बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी पंडीत पाटील यांनी निवेदनातून केली आहे.

Exit mobile version