निधीअभावी मानधन लांबणीवर
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पुरविणारे रायगड जिल्हयातील तीन हजार कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहे. या कर्मचार्यांचे निधीअभावी मासिक मानधन लांबणीवर गेले आहेत. त्यामुळे महिन्याचा आर्थिक ताळमेळ जुळविताना कर्मचार्यांची तारांबळ उडाली आहे. सुमारे 5 कोटी रुपयांच्या निधीची गरज असल्याची माहिती समोर येत आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा सेविका, डाटा ऑपरेटर, परिचारिका, आरोग्य सेविका, अकाऊंटट अशी वेगवेगळी पदे कंत्राटी स्वरुपात भरण्यात आली. या कंत्राटी कर्मचार्यांच्या मदतीने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो. आशा सेविका घरोघरी जाऊन शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देतात. कुष्ठरोग शोध मोहिमेसह लसीकरण व इतर कामे तुटपुंज्या वेतनामध्ये आशा सेविका करतात.
ग्रामीण भागातील रुग्णांना गावातच उपचारासाठी संधी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. वेगवेगळ्या आजारांवर यांच्यामार्फत उपचाराची व्यवस्था करण्यात आली. ग्रामीण भागात आरोग्य सेविका, सेवकांसह डाटा ऑपरेटरद्वारेदेखील आरोग्य सेवेचे काम करण्यात आले. आरोग्य विभागांतर्गत वेगवेगळ्या प्रकारची ऑनलाईन प्रकारची कामे डाटा ऑपरेटरद्वारे केले जात आहे. मात्र याच कर्मचार्यांना वेळेवर मानधनच मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काहींचे तीन महिने तर काहींचे एक ते दोन महिन्याचे मानधन थकीत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कर्मचार्यांना मानधन दिले जाते. मात्र महिनोमहिने मानधन न मिळाल्याने हे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहे. महिन्याचा घरखर्च चालविताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या कर्मचार्यांना मानधन देण्यासाठी शासनाकडून निधीच उपलब्ध झाले नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. परंतु शासनाकडून निधीच वेळेवर मिळत नसल्याने ही समस्या कायमची भेडसावत आहे. ऑनलाईनच्या युगात मानधनाची कामे जलद गतीने होण्याची अपेक्षा असताना ही कामे महिनो महिने प्रलंबित असल्याने शासनाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्हयातील कंत्राटी कर्मचार्यांना मानधन मिळावे, यासाठी शासनाकडून मागणी करण्यात आली आहे. तेथील अधिकार्यांशी संपर्क देखील साधण्यात आला आहे. दोन दिवसात निधी येण्याची शक्यता आहे. त्यानंत तात्काळ कर्मचार्यांच्या खात्यात मानधन जमा केले जाईल.
डॉ. मनिषा विखे
जिल्हा आरोग्य अधिकारी