। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई ते दुबई अंडरवॉटर रेल्वे प्रोजेक्ट एक प्रस्तावित योजना आहे. संयुक्त अरब अमीरातची कंपनी नॅशनल एडवाइजर ब्युरो लिमिटेड ही योजना मांडली आहे. हे एक हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क असेल. अरबी समुद्रमार्गे भारत आणि युएईला जोडण्याचा प्रोजेक्ट आहे. 2018 साली पहिल्यांदा या प्रोजेक्टवर चर्चा झाली होती. अलीकडच्या काही वर्षात पुन्हा एकदा या प्रोजेक्टवर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम भारत दौर्यावर आहेत. याच दरम्यान भारत-यूएईमध्ये आर्थिक आणि वाणिज्यिक सहकार्यासह भविष्यातील विविध मुद्यांवर चर्चा होईल.
गल्फमधील वर्तमानपत्र खलीज टाइम्समध्ये या प्रोजेक्ट संबंधी मंगळवारी एक रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. वर्तमानपत्राने नॅशनल एडवायजर ब्यूरो लिमिटेडच्या हवाल्याने म्हटलंय की, हा प्रोजेक्ट कॉन्सेप्ट स्टेजमध्ये आहे. नॅशनल एडवायजर ब्युरो लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अब्दुल्ला अल शेही खलीज टाइम्सशी बोलताना म्हणाले की, या प्रोजेक्टच्या फंडिंगवर चर्चेआधी कंपनीला अधिकृत मंजुरी घ्यावी लागेल. यावर आता काही स्पष्ट करता येणार नाही.
या प्रोजेक्टमागे उद्देश काय?
नॅशनल एडवायजर ब्यूरो लिमिटेडने या प्रोजेक्टची आयडिया 6 वर्षापूर्वी यूएई-इंडिया कॉन्क्लेव अबू-धाबीमध्ये मांडली होती. अब्दु्ल्ला शेहीने या प्रोजेक्टचा जो आराखडा मांडलाय, त्या नुसार प्रोजेक्टमध्ये अल्ट्रा-स्पीड फ्लोटिंग ट्रेन्सच्या माध्यमातून मुंबईला दुबईच्या फुजैराहशी जोडण्याची योजना आहे. द्विपक्षीय व्यापाराला प्रोत्साहन देणं हा या प्रोजेक्टमागे उद्देश आहे. फुजैराह बंदरातून भारताला तेल निर्यात होईल आणि मुंबईच्या उत्तरेला असलेल्या नर्मदा नदीतून अतिरिक्त पाणी दुबईत आणलं जाईल. त्याशिवाय या रूटवर धावणार्या ट्रेन्समधून मुंबई-दुबई आणि दुबई-मुंबई अशी प्रवासी वाहतूकही करता येईल.
ट्रेनचा वेग किती असेल?
अब्दुल्ला अल शेही यांच्यानुसार हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास अन्य रुटवर सुद्धा विचार होऊ शकतो. या ट्रेनच्या मार्गात पाकिस्तान, बांग्लादेशातील शहरं सुद्धा येतील. समुद्राच्या पोटातून जाणार्या या रेल्वे मार्गाची लांबी जवळपास 2000 किलोमीटर असेल. प्रतितास 600 किलामीटर ते 1000 किलोमीटर ट्रेनचा स्पीड असेल. अल शेही यांच्यानुसार ट्रेनला इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर करुन टनलमध्ये उचलण्यात येईल. मॅग्लेव टेक्नोलॉजी म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे ट्रेनचा वेग प्रतितास 1000 किमीपर्यंत पोहोचेल. त्यामुळे दुबई-मुंबई प्रवास दोन तासावर येईल. सध्या विमान प्रवासाला दोन ते तीन तास लागतात. मॅग्लेव टेक्नोलॉजीच्या आधारावर जपान आणि चीनमध्ये बुलेट ट्रेन धावतात.