आरोग्यवर्धक रानमेव्याची लयलूट

मेव्याला पर्यटकांकडून विशेष मागणी
आदिवासी महिलांना चांगला रोजगार

| पाली | वार्ताहर |

बहुविध वृक्षराजीने समृद्ध रायगड जिल्ह्यातील रानावनात तयार झालेला करवंद, जांभूळ, तोरण, भोकर, आळू, जाम, कोकम, रांजण आदी रानमेवा खवय्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. अवकाळी पावसामुळे जरी तो बाजारात उशिराने दाखल झाला असला तरी कोकणच्या मेव्याला पर्यटकांकडून विशेष मागणी आहे. अनेकजण परतीच्या प्रवासात आदिवासी महिलांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. त्यामुळे आदिवासी महिलांना चांगला रोजगार मिळतो आहे.
रानमेव्याची खासियत म्हणजे जंगल, माळरान, गावाच्या सीमेवरील मोकळ्या जागेमध्ये आणि जंगलाजवळील वस्त्यांत किंवा शेतमळ्यात कोणतीही लागवड, मशागत किंवा खास देखभाल न करता नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या व वाढणाऱ्या ही फळे बहुगुणी असतात. रानफळांमधून आदिवासींना व जंगलातल्या प्राण्यांना शरीरास आवश्यक असणारी जीवनसत्वे, प्रथिने, लोह व कॅल्शिअम मिळत असते. तसेच आदिवासी समाजासाठी हे महत्त्वाचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. रानमेवा ज्या प्रदेशात उगवतो त्या प्रदेशातील जैवविविधतेचे प्रतिनिधित्व देखील करतो.


करवंद, जांभळे
केवळ उन्हाळी हंगामात मिळणारी करवंद व जांभळे बाजारात आली आहेत. आकाराने मोठी, टपोरी जांभळे व करवंदाना मागणी आहे. मधुमेहावर जांभळे अतिशय गुणकारी आहेत. आदिवासी बांधवांकडून जंगलातून जांभळे, करवंद गोळा करून तालुक्याच्या बाजारात विक्री केली जातात. गतवर्षी दहा रुपयांना मिळणारा वाटा 20 रुपयांचा झाला आहे. मात्र आरोग्यवर्धक असल्याने खवय्यांकडून आवर्जून विकत घेतल्या आहेत. याशिवाय रानामध्ये जाऊन करवंदाच्या जाळीतून करवंद काढणे हा काही वेगळाच आनंद असतो


तोरण, रांजण
गुलाबी लाल रंगाची गोड तोरण सर्वच जण आवडीने खातात. खाण्यास पिठूळ असतात. सध्या बाजारात तोरण कमी दिसत आहेत. त्याच्या बियाही भाजून खाल्ल्‌‍या जातात. हिरड्या व दातदुखीवर त्या बहुगुणी आहेत. तर रांजण हे पिवळ्या रंगाची लहान फळ असते. खाण्यासाठी मधुर फळात बारीक बी असते.

भोकर
हिरव्या कच्चा भोकरांची भाजी करतात, तर पिकलेली पांढरी-पिवळी भोकरे नुसती खाल्ली जातात. भोकर खाण्यास चिकट असतात. सध्या भोकरांची झाडे कमी होत चालली आहेत. भोकराचे फळ कृमिनाशक, कफोत्सारक व खोकल्यापासून आराम देणारे आहे. कोरडा खोकला, छाती व मूत्र नलिकेचे रोग, पित्तप्रकोप, दीर्घकालीन ताप, तहान कमी करणे, जखम व व्रण भरण्यासाठी भोकराचे फळ उपयुक्त आहे. सांधेदुखी, घशाची जळजळ यासाठीही भोकराचे फळ उपयोगी आहे.

कोकम/रातांबा
जिल्ह्यात श्रीवर्धन, अलिबाग, मुरूड, माणगाव आदी पट्ट्यात कोकमाची झाडे अधिक आढळतात. आरोग्यवर्धक कोकमाचा रस केला जातो, सुकवून भाजीत किंवा मासळीच्या रस्स्यात खातात. जळजळ, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यात कोकम सरबत आवर्जून प्यायले जाते. आगोटीच्या कामात कोकम तयार करणे, सुकवण्याला विशेष प्राधान्य दिले जाते.

अळू
अळूची पाने पेरूच्या झाडासारखी असतात. त्यावर अळूची गोल-गोल फळे येतात. ती दिसायला चिक्कीसारखी आणि चवीला आंबट-गोड असतात. पाऊस पडला की फळांमध्ये बारीक अळ्या पडतात, त्यामुळे उन्हाळ्यातच या फळे आवर्जून खाल्ली जातात. अनेकजण ती वाळवूनही ठेवतात.

रानमेवा संवर्धनाची गरज
जंगलांचे संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे. जंगल वाचले तर रानमेवा वाचेल. रानमेव्याचे औषधी गुणधर्म सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. याकरिता गावांबरोबरच शहरांमध्येही आरोग्यवर्धन रानमेव्याची माहिती प्रसारित झाली पाहिजे. वृक्ष लागवडीसारखे उपक्रम राबवताना, प्रामुख्याने प्रदेशनिष्ठ रानमेव्याचा विचार करून लागवडीस प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे पर्यावरण प्रेमींकडून सांगण्यात येते.

Exit mobile version