गोविदांवर लाखो रूपयांची उधळण
| पाली | वार्ताहर |
गोकुळाष्टमी हा रायगड जिल्ह्यातील महत्वाचा व उत्साहाचा सण असून मंगळवारी साजरा होत आहे. अबाल वृद्धांसह तरुणाईला गोकुळाष्टमीची ओढ लागलेली असते. यावेळी पारंपारिक पेहराव व वाद्यांच्या चालीवर सर्वचजण ढाक्कुमाकुमच्या सुरात श्रीकृष्ण जन्माचा उत्सव आनंदात साजरा करत असतात. तसेच, आजच्या या दिवशी दहीहंडी फोडण्याचा थरार देखील अविस्मरणीय असतो. शिवाय जिल्ह्यात ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे देखील लावण्यात आलेली आहेत. यामुळे जिल्ह्यात दहीहंडी सणासाठी सर्वत्र उत्साह संचारला आहे.
जिल्ह्यात दहीहंडी सणाला सांस्कृतिक व धार्मिक वेगळे महत्व आहे. जिल्ह्यात मंगळवारी (दि.27) भव्य दिव्य दहीहंडी महोत्सव साजरा होत आहे. गोविंदा पथकांना मोठ्या रकमेची बक्षिसे लावल्याने गोविंदांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. लाखोंची बक्षिसे असलेली दहीहंडी फोडण्याचा थरार देखील अविस्मरणीय असतो. रोख रुपयांचे पारितोषिक व आकर्षक चषक देऊन विजेत्यास गौरविण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येकी 6 थरांच्या सलामिस रोख रूपये व इतर आकर्षक बक्षिसे देखील लावण्यात आली आहेत. तसेच, काही वर्षांपासून महिला गोविंदा पथक देखील उत्स्फुर्त सहभाग नोंदवत आहेत.
दहीहंडी महोत्सवा दरम्यान नृत्याविष्कार देखील सादर होणार आहेत. यामुळे गोविंदा पथकात मोठा उत्साह दिसून येत आहे. नोकरी, व्यवसाय व शिक्षणानिमित्त मुंबई, पुणे ठाणे व इतर जिल्ह्यात असलेले तरुण आवर्जून दहीहंडी उत्सवासाठी आपल्या गावी येत असतात. शिवाय लाखोंचे पारितोषिक आपल्याच पथकाला मिळावे यासाठी गोविंदा महिनाभर आधीपासूनच थर रचण्याचा सराव करत होते.
प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
गोकुळाष्टमी म्हणजे फक्त दहीहंडी फोडणे इतक्या मर्यादेचा सण नाही. गोकुळाष्टमीच्या अगोदर व दरम्यान ठिकठिकाणी सांस्कृतिक व समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार केला जातो. तर कुठे विविध खेळ व स्पर्धा भरविल्या जातात. तर काही ठिकाणी विविध गुणदर्शन कार्यक्रम घेतले जातात. यावेळी शाळा महाविद्यालयात देखील दहीहंडीची धूम पाहायला मिळते. तसेच, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात.
नवसपूर्ण करण्यासाठी दावण
श्रीवर्धन तालुक्यात अनेक नवस गोकुळाष्टमीच्या दिवशी पूर्ण केले जातात. प्रत्येक पाखाडीतुन स्वतंत्र दावण निघते. दावण म्हणजे पाखाडीतील तरुण लहान मुले मानवी साखळी निर्माण करतात. श्रीकृष्णाचा जयघोष करीत प्रत्येक पाखाडीतील लोक संपूर्ण गावभर भ्रमंती करतात. यावेळी प्रत्येक मंदिर, पाखाडीला भेट दिली जाते. दावण हा मैत्री, एकोपा, प्रेम, आपुलकी, स्नेह याचे प्रतीक मानले जाते.