| खांदेश्वर | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील खैरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील कोंडले येथील एकदंत सोसायटीजवळ मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यालगत साचलेल्या या कचऱ्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून परिसरात अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे.
एकदंत सोसायटीजवळील परिसरात उघड्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने नागरिकांना नाक मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. विशेष म्हणजे, या कचऱ्यात प्लास्टिकच्या पिशव्या, खाद्यपदार्थांचे अवशेष आणि इतर टाकाऊ वस्तू मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. कचऱ्यातील अन्नपदार्थ खाण्यासाठी पाळीव तसेच मोकाट जनावरे या ठिकाणी येत असतात. कचऱ्यातील अन्नपदार्थ खाताना जनावरांच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या किंवा इतर प्लास्टिकजन्य वस्तू जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. नागरिकांच्या आरोग्याबरोबरच मुक्या जनावरांच्या जीविताचाही प्रश्न या कचऱ्यामुळे निर्माण झाला आहे. परिसरात वाढणारी अस्वच्छता आणि दुर्गंधी यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कचरा टाकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे. खैरवाडी ग्रामपंचायतीने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन साचलेला कचरा उचलावा, परिसराची स्वच्छता करावी आणि भविष्यात येथे कचरा टाकला जाणार नाही यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोंडले एकदंत सोसायटीजवळ कचऱ्याचे ढीग
