उरण नगरपालिकेच्या खारफुटी कचरा प्रकरणी सुनावणी

। उरण । वार्ताहर ।
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने उरण नगरपालिकेवर खारफुटीवर कचरा टाकल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचल्याबद्दल दंड ठोठावला आहे. मात्र उरण नगरपालिकेने हा आरोप नाकारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी येत्या सोमवार (दि.25) सुनावणी होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांना देखील उपस्थित राहणार आहेत. नगरपालिका विरुद्ध सुरू असलेल्या खटल्यामध्ये मुबंई उच्च न्यायालयामध्ये उरण नगरपालिकेचे सॅनिटरी इन्स्पेक्टर हरेश भैरू तेजी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की अगदी करंजा स्थित नौदल शस्त्रास्त्र डेपो देखील बोरी पाखाडी भूखंडावर कचरा फेकत आहे. उरण नगरपालिका अंदाजे 60टक्के भाग एनएडी सुरक्षा प्रभागात अंतभूत होता. याचिकाकर्ता हनुमान कोळीवाडा मच्छीमार विकास संस्थेचे वकील मिनाझ ककाली यांनी सादर केलेल्या खारफुटीवर निरंतरपणे फेकल्या जाणार्‍या कचर्‍याच्या फोटो स्वरूपातील पुराव्याची न्यायालयाने 8 ऑक्टोबर रोजी गंभीर दखल घेत उरण नगरपालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते.

या आधी न्यायालयाने डंपिंग करणे थांबवा असे आदेश नगरपालिकेला दिले असतानाही या आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. याचिकाकर्त्यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे खारफुटीची कोणतीही हानी झाली नसल्याचा दावा उरण नगरपालिकेच्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. पंतप्रधानांना केलेल्या विनंतीनंतर केंद्र व राज्यात जवळपास 15 वेळा ई मेल पाठवून कोणतीही कारवाई झाली नसल्याची खंत पर्यावरणवादी कार्यकर्ते बी. एन. कुमार यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल न्यायालयाने घेत रायगड जिल्हाधिकारी यांना येत्या सोमवार होणार्‍या सुनावणीला व्हिडीओ कॉन्फरसिंग मार्फत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Exit mobile version